
स्नेहा वड्डर, प्रतीक्षा मानेची राज्यात बाजी
मांगुर : जिद्द, मेहनत, चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर कठीण परिस्थितीवर मात करता येते, हे कारदगा (ता. निपाणी) येथील स्नेहा शिवाजी वड्डर व दड्डी (ता. हुक्केरी) येथील प्रतीक्षा पांडुरंग माने (मुळगाव हरगापूरगड) यांनी दाखवून दिले आहे. दहावी परीक्षेत त्यांनी 625 पैकी 622 (९९.५२ टक्के) गुण घेऊन मराठी माध्यमात राज्यात प्रथम पटकावण्याची किमया साधली आहे. त्यामुळे कारदगा व दड्डी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष बाब म्हणजे कारदगा डी. एस. नाडगे हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली स्नेहा ही सेंट्रीग कामगाराची तर दड्डीतील सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली प्रतीक्षा ही फोटोग्राफर व झेरॉक्स दुकानदाराची मुलगी आहे.
कारदगासारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहा हिने आपल्या अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केल्याने कौतूक होत आहे. मराठी, गणित, कन्नड या विषयात तिने पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत. इंग्लिश, विज्ञान आणि समाज विज्ञान या विषयात 100 पैकी 99 गुण मिळविले आहेत. स्नेहा हिच्या यशाची माहिती कारदगा गावामध्ये कळताच डी. एस. नाडगे हायस्कूलचे शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सत्कार करून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला.
प्रतीक्षा हिने मराठी माध्यमातून हुक्केरी तालुक्यात प्रथम तर सर्व माध्यमातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिला मराठी विषयात 124, इंग्रजीला 98 तर कन्नड गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. विशेष योगायोग म्हणजे तिची जुळी बहीण प्राजक्ता माने हिने यंदाच दहावीला ९६.१६ टक्के गुण मिळवत सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूलमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मराठी माध्यमात कारदगा गावचा राज्यात दुसऱ्यांदा झेंडा
कारदगा येथील साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांची कन्या प्रतिज्ञा काशीद हिने देखील २०१९-२० वर्षात मराठी माध्यमात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. प्रतिज्ञा हिच्या यशापाठोपाठ आता स्नेहा हिने देखील राज्यात मराठी माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे मराठी माध्यमात कारदगा गावच्या यशाचा झेंडा दुसऱयांदा रोवला गेला आहे.
बेळगावची सायली तूपारे राज्यात दुसरी
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी सायली भरमा तूपारे हिने ९९.२० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच तिने मराठी माध्यमात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे तिच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशाचे खरे शिलेदार हे माझे आई-वडील आहेत. त्यांनी रात्र-दिवस कष्ट करून शिक्षणाची काळजी घेतली. शाळेतील सर्व शिक्षकांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्दिमत्ता) तंत्रज्ञानात करिअर करण्याचा निश्चय केला आहे.
-स्नेहा वड्डर, विद्यार्थिनी
आमच्या मुलीने रात्र-दिवस अभ्यास करून अत्यंत कठीण परिस्थितीतून हे यश साध्य केले आहे. ती राज्यात मराठी माध्यमात पहिली आल्याने मन भरून आले. हे घवघवीत यश मिळवून मुलीने आमची मान उंचावली आहे.
-आरती व शिवाजी वड्डर,आई-वडील, कारदगा
दहावीतील या यशाचे श्रेय आई-वडिलांसह शिक्षकांचे आहे. वडिलांनी जास्त कष्ट घेतले. मला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे.
-प्रतिक्षा माने, विद्यार्थिनी
Web Title: Tenth Result Sneha Vaddar Pratiksha Mane First In State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..