दहावी, बारावीचे विद्यार्थी तणावमुक्त परीक्षा देतील; परीक्षा अर्ज भरले

अजित झळके
Tuesday, 9 February 2021

दहावी आणि बारावीचे विद्यार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देतील. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास सुरु आहे.

सांगली ः दहावी आणि बारावीचे विद्यार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देतील. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास सुरु आहे. कोरोना संकटानंतर आलेल्या बदलांचा त्यावर फार परिणाम होऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे, असा विश्‍वास माध्यमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला. 

माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून विष्णू कांबळे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. कोरोना नंतरच्या काळात शिक्षण व्यवस्थेतील बदल आणि दहावी, बारावीच्या परीक्षा हाच त्यांच्यासमोरचा मुख्य आव्हानाचा विषय असणार आहे. सध्या या दोन्ही वर्गांच्या परीक्षा अर्जांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

एरवी बारावीच्या परीक्षा तोंडावर असायच्या आणि दहावीचे विद्यार्थी अंतिम परीक्षेच्या तयारीत जुंपलेले असायचे. हे वर्ष वेगळे आहे. कोरोना संकटामुळे तब्बल सात-आठ महिन्यानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. शिकवण्यास, अभ्यासास अत्यंत कमी वेळ मिळाला आहे. हा वेळ कसा पुरेसा ठरणार, विद्यार्थी आणि शिक्षकांचा ताळमेळ कसा होणार, असे अनेक प्रश्‍न कायम आहेत. शासनाने 25 टक्केच अभ्यासक्रम निश्‍चित केल्यामुळे दिलासा मिळाला आहे, मात्र परीक्षेची पद्धत तीच असणार आहे. गुण तितकेच असणार आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता आहे. 

श्री. कांबळे म्हणाले, ""येत्या काही दिवसांत बोर्डाची बैठक होणार आहे. त्यातील नियोजन पाहून पुढील कार्यवाही केली जाईल. कोरोना काळातील बदलेल्या परिस्थितीत आम्ही योग्य नियोजन करू. अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीबाबत सतत सूचना दिल्या जात आहेत.'' 

कमी ताण, भरपूर अभ्यास 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कमी ताण घ्या आणि भरपूर अभ्यास करा, अशा सूचना दिल्या आहेत. एरंडोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. सी. पाटील म्हणाले, ""या दोन्ही परीक्षा मैलाचा दगड मानल्या जातात, मात्र हे वर्ष वेगळे आहे. शिक्षण क्षेत्रासाठीही आव्हानात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण तणाव न घेता आनंदाने शिकावे आणि उत्तम पद्धतीने परीक्षा द्यावी, असाच आमचा प्रयत्न आहे.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tenth, twelfth grade students will take stress-free exams; Exam application filled