महापालिका लक्ष देईना; समस्या सुटेनात! नागरिकांनी जायचे कोठे?

मिलिंद देसाई
Sunday, 16 August 2020

कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलणे आवश्‍यक होते.

बेळगाव : शहर आणि परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. याचबरोबर शहरवासियांना इतर समस्यांचाही सामना करावा लागत आहे. मात्र, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी पुढे येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून विविध समस्या घेऊन नागरीक माजी नगरसेवकांच्या घराकडे गर्दी करु लागले आहेत. 

2019 मध्ये बेळगाव महापालिकेची मुदत संपली आहे. त्यानंतर वेळेत निवडणुका घेणे आवश्‍यक असतानाही महापालिकेची निवडणूक जाणीवपुर्वक पुढे ढकलण्यात आली. त्यातच मार्चपासून कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी होतील, याबाबत सध्या तरी अनिश्‍चितता आहे. मात्र, कोरोना संकटावेळी महापालिकेने ज्या तत्परतनेने काम करणे आवश्‍यक होते, ते होत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्ण सापडलेल्या भागात तातडीने निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक असताना ते दोन ते तीन दिवसानंतर केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. तसेच स्वच्छता निरीक्षकही नागरिकांची तक्रार ऐकून घेत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्‍त करत असून ते माजी नगरसेवकांकडे धाव घेत तक्रारी मांडत आहेत. 

कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलणे आवश्‍यक होते. परंतु लोकप्रतिनिधीही शांतच असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. काही दिवसांपूर्वी नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्‍त करणारे अनेकजण सध्या नगरसेवकांची गरज असल्याचे मत व्यक्‍त करत आहे. महापालिकेत लोकनियुक्‍त सभागृह असते तर अधिकाऱ्यांना ते जाब विचारुन कारभारावर वचक ठेवू शकले असते. तसेच नगरसेवक स्वत: पुढाकार घेत आपल्या भागातील समस्यांकडे लक्ष वेधूही शकले असते. मात्र, सध्या लोकनियुक्‍त समस्या नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

हे पण वाचा - कोरोनाने घेतला तरूण ग्रामपंचायत सदस्याचा बळी 

 

"कोरोना संकटामुळे शहरात अनेक समस्या उद्‌भवत आहेत. अशा परिस्थितीत विविध समस्या सांगण्यासाठी नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तरी लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेकजण माजी नगरसेवकांकडे जाऊन तक्रारी मांडत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांबाबत माहिती दिली जात आहे. सध्याच्या संकटकाळात लोकनियुक्‍त सभागृहाची आवश्‍यकता होती.'' 

-रतन मासेकर, माजी नगरसेवक

संपादन- धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The term of Belgaum Municipal Corporation has expired in 2019