"फेसाटी'कार नवनाथ गोरेंना भारती विद्यापीठ देणार नोकरी, विश्‍वजीत कदम यांची ग्वाही

अजित झळके
Thursday, 24 September 2020

एक उत्तम दर्जाचे पुस्तक जन्माला घातलेला लेखक शेतमजुरी करतोय, या "सकाळ'मधील बातमीने आज राज्यातील संवेदनशील, साहित्यप्रिय माणसाला वेदना झाल्या.

सांगली ः एक उत्तम दर्जाचे पुस्तक जन्माला घातलेला लेखक शेतमजुरी करतोय, या "सकाळ'मधील बातमीने आज राज्यातील संवेदनशील, साहित्यप्रिय माणसाला वेदना झाल्या. त्यांनी या लेखकासाठी मदतीचा हात पुढे केला. "मला उचलून पैसे नको आहेत, मला नोकरी हवीय', असे सांगत नवनाथ गोरे नावाच्या या लेखकाने "मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा'चे दर्शन घडवले. भारती विद्यापीठाचे कार्यवाह, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी तत्काळ या लेखकाला भारती विद्यापीठात नोकरी देण्याची ग्वाही दिली. संघर्षाने काळवंडलेला नवनाथ यांचा चेहरा या बातमीमुळे फुलला. 

निगडी बुद्रुक (ता. जत) येथील नवनाथ गोरे हे एम.ए. बीएड्‌ झालेले उच्चशिक्षित तरुण. त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाची शब्दमाळ गुंफली आणि "फेसाटी' नावाने ती पुस्तक रुपाने जन्माला घातली. त्यांच्या या पहिल्याच पुस्तकाने छाप उमटवत साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार खूप मानाचा समजला जातो. शिरपेचातील तुरा... पण या तुऱ्यापलिकडे नवनाथ यांचे हात रिकामेच. भाकरीसाठीचा संघर्ष. तो काही चुकला नाही. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर काही ठिकाणाहून मदत मिळाली, नगरमध्ये हंगामी नोकरीही मिळाली, मात्र कोरोनाने ती गेली. संकट गडद झाले. हातातोंडाची गाठ पडेना झाल्यावर नवनाथ यांनी शेतमजुरी सुरु केली. ही धक्कादायक, वेदनादायक बातमी "सकाळ'ने आज प्रसिद्ध केली. ती महाराष्ट्रभर साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय बनली. 

अनेकांनी नवनाथ यांचा संपर्क मिळवून मदतीसाठी हात पुढे केला. त्यावेळी नवनाथ यांनी, "मी घर चालवतोय, चाललय माझं ठीक. मला असे उचलून पैसे नकोत, ते काही कडेला जाणार नाहीत. मला नोकरी हवी आहे. ती मिळाली तर बरी होईल', अशी विनंती केली. खानदेश विचार मंचने मदत देण्याची घोषणा केली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचे कार्यकर्ते भरीव मदत करणार आहेत. त्यांना हवीय ती नोकरी भारती विद्यापीठाने देण्याचे ठरवले आहे. जतचे आमदार विक्रम सावंत यांनी या विषयावर श्री. विश्‍वजीत कदम यांच्याशी चर्चा केली. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले. 

 

""महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत परिस्थितीने रंजला, गांजला असेल तर त्याला हात देऊन उभे करण्याचे काम डॉ. पतंगराव कदम यांनी केले. तोच वारसा आणि तीच परंपरा आम्ही चालवतोय. नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठात हक्काची नोकरी आम्ही देऊच, शिवाय ते लिहते रहावेत, यासाठीही पाठबळ देऊ.'' 

विश्‍वजीत कदम, 
कार्यवाही, भारती विद्यापीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testimony of Vishwajeet Kadam that Bharati University will give a job to Navnath Gore