esakal | खरीप गेला वाया, आता रब्बीवर आशा
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

खरीप गेला वाया, आता रब्बीवर आशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : यंदाच्या वर्षीही जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामावर पाणी सोडावे लागले. मात्र शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी आता कंबर कसली असून रब्बी हंगाम तरी आर्थिक अडचणीतून बाहेर काढेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

जिल्हा कृषी खात्याने रब्बी हंगामासाठीची तयारी केली आहे. यंदा ३ लाख १४ हजार हेक्‍टर शेतजमिनीत रब्बी हंगाम साधण्याचे कृषी खात्याचे उद्दिष्ट आहे. रब्बी हंगामातील पेरणीच्या काळातच पावसाला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. सध्या हा पाऊस हंगामासाठी पोषक असला तरी पुन्हा अतिवृष्टी झाल्यास रब्बी हंगामातील पेरणी देखील नुकसानीची ठरेल, अशी भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ७९ हजार हेक्‍टर प्रदेशात पेरणी झाली होती. पण बेळगाव जिल्ह्यातील २५ विभागात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

कृषी खात्याने जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार २८५ प्रदेशात रब्बी हंगाम साधला जाण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी ५० हजार ४५० क्विंटल जोंधळा, गहू, मका, हरभरा, सुर्यफूल व इतर पिकांची बियाणे, ४५ हजार टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करून दिला आहे. पेरणीची तयारी शेतकरी करीत असतानाच शेतमजुरांचाही भाव वधारलेला असल्याने शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतमजुरांकडून ३०० ते ३५० रुपये एका दिवसाची मजुरी मागितली जात आहे. सूर्यफुलांच्या बियाणांचा दरही प्रति किलो अचानक ११० रुपयांवरून १६० रुपयांवर पोहोचला आहे.

रब्बी हंगाम साधतानाच पावसाला सुरुवात झालेली असल्याने शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जात आहेत.

- शिवनगौडा पाटील, सहसंचालक, कृषी खाते

पेरणीचे उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)

  1. जोंधळा -१ लाख ११,५००

  2. मका -३१,०००

  3. गहू -५२,४५५

  4. हरभरा -१ लाख ६,११०

  5. सूर्यफूल -५,९००

  6. इतर पिके-७,३२०

loading image
go to top