esakal | नीट परीक्षेची पद्धतच ‘नीट’ नव्हती; पालक-विद्यार्थ्यांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

NEET UG

नीट परीक्षेची पद्धतच ‘नीट’ नव्हती; पालक-विद्यार्थ्यांचा संताप

sakal_logo
By
अजित झळके

सांगली: बारावीनंतर व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा आज झाली. या परीक्षा घेण्याच्या पद्धती व नियोजनात काही ‘नीट’ नव्हते, असा संताप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. वेळापत्रकापासून ते सुविधांपर्यंत पुरता गोंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

हेही वाचा: जेवण न मिळाल्यास मला फोन करा!

नीट परीक्षेसाठी जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी नि:श्‍वास टाकला होता. फार धावपळ होणार नाही, प्रवास करावा लागणार नाही, आपल्या परिसरात परीक्षा असल्याने थोडा आत्मविश्‍वास वाढेल, असेच चित्र होते. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होताना मात्र विद्यार्थी निराश झाले. प्रत्यक्ष परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होणार होती.

विद्यार्थ्यांनी केंद्रांवर सकाळी ११ पासूनच रिपोर्टिंग करण्याची सूचना होती. सोबत फक्त पाण्याची बाटली ठेवण्याची परवानगी होती. सायंकाळी पाचपर्यंत परीक्षा चालली. अकरा ते पाच म्हणजे तब्बल सहा तास मुले काहीही न खाता पिता परीक्षेला सामोरी गेली. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रात आत जाण्याआधी थोडी उजळणी करावी तर पुस्तकेही आत नेण्यास परवानगी देण्यात आली नाही.

त्यामुळे पहिले दोन-अडीच तास नाहक गेले. परीक्षा सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. काहीजणांचे नाव चुकीचे होते. स्पेलिंग चुकीचे होते. त्यात सुधारणा करण्याची धावपळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण तीन तास पेपर लिहिता आलाच नाही.

एक पालक म्हणाले, ‘‘मुलांनी दोन-अडीच वर्षे घाम गाळून अभ्यास केला. तयारी पक्की होती. परंतु, आजच्या वातावरणामुळे त्यांच्यांवर परिणाम होण्याची भीती आहे. नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची?’’

पालक-विद्यार्थ्यांची निरीक्षणे

- गरज नसताना ११ वाजता बोलावले.

- शाळा परिसरात वातावरण चांगले नव्हते.

- चहा-बिस्किट मिळेल असे सांगितले, प्रत्यक्ष चहा आला साडेचार वाजता.

- विविध तांत्रिक बाबींच्या पूर्ततेत १५ ते २० मिनिटे वेळ वाया गेला.

- परीक्षा घेण्याची पद्धत व तांत्रिक बाबींबाबत नाराजी.

- काही पालक थेट सरकारकडे तक्रार करण्याच्या तयारीत.

- अॅडमीट कार्डवर पोस्टकार्ड आकाराच्या फोटो सक्तीने गोंधळ.

- पर्यवेक्षकांना योग्य प्रशिक्षण नसल्याचे जाणवले.

- मास्क वाटले, पण टोचत होते.

- वाटलेले पेन परत काढून घेतले.

loading image
go to top