Belgaum : रस्ता रुंदीकरणाच्या हालचाली झाल्या सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road

रस्ता रुंदीकरणाच्या हालचाली झाल्या सुरु

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

बेळगाव : पिरनवाडी नाका ते व्हीटीयूपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचाली सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरु केल्या आहेत. व्हीटीयूपासून काही अंतरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी लावून सपाटीकरण करण्यात आले आहे. सध्या काम बंद असले तरी कागी दिवसात पुन्हा कामाला सुरवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी व्हीटीयू ते पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तेव्हापासून पिरनवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ता ११० फुटाचा केल्यास मोठे नुकसान होणार असल्याने व्यापारी व रहिवाशांची चिंता वाढली आहे. अशातच व्हीटीयूपासून ठिकठिकाणी स्वच्छता करण्यासह काही ठिकाणी सपाटीकरण करण्यात आल्याने सर्वांची धास्ती वाढली आहे. लोकांचे नुकसान टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी होत आहे.

रस्ता करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी गावातील लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता बांधकाम खात्याने रस्ताकामाचे पूजन केले होते. तसेच लवकरच कामाला सुरवात होणार असल्याची माहिती दिली होती. हा रस्ता १४० फूट रुंद करण्याची योजना आहे. मात्र, या रुंदीला विरोध करीत या भागातील व्यापाऱ्यांनी एक दिवस बंद पाळला होता. तसेच बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन १४० ऐवजी ७० फुटी रस्ता करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी १४० ऐवजी ११० फुटांचा रस्ता करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले होते.

रुंदीकरण केल्यास नुकसान होणार असल्याने व्यापारी वर्गात सध्या भीतीचे वातावरण कायम आहे. रस्ता ११० फुटी केल्यास दोन्ही बाजूची सर्व दुकाने काढावी लागणार आहेत. तसेच रस्त्याला लागून असलेल्या अनेक घरांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे, वाढीव रुंदीकरणास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लवकरच बैठक

बांधकाम खात्याने व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्वांची व्यापक बैठक घेऊन पुढील रुपरेषा ठरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गरज पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचाही विचार आहे.

loading image
go to top