esakal | कोरोनाबाधित सराफाच्या घरात चोरी; अर्धा किलो सोन्यासह रोकड पळवली
sakal

बोलून बातमी शोधा

theft in Corona affected jewwller's home; Half kilo gold stolen

भिलवडी (जि. सांगली) येथील कोरोनाबाधित सराफाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सुमारे अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला.

कोरोनाबाधित सराफाच्या घरात चोरी; अर्धा किलो सोन्यासह रोकड पळवली

sakal_logo
By
सतीश तोडकर

भिलवडी (जि. सांगली) : येथील कोरोनाबाधित सराफाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सुमारे अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. गावच्या मध्यवस्तीत झालेल्या या चोरीची घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

संबंधित सराफाचे गावच्या मधल्या गल्लीत तीन मजली घर आहे. सराफासह कुटुंबातील वडील, आई व पत्नी असे चार जण 2 सप्टेंबर रोजी कोरोना बाधित झाले होते. उपचारानंतर सांगलीच्या घरी क्वारंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसांत भिलवडीला परतणार होते. दरम्यान, काल मध्यरात्री चोरट्यांनी घराचा पूर्वेकडील लोखंडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी कपाटातील आई व पत्नीचे सुमारे पाचशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख 15 हजार रुपये पळविले.

याच ठिकाणी असलेल्या चांदीच्या दागिन्यांना चोरट्यांनी हात लावला नाही. आज सकाळी शेजारी राहणाऱ्यांना यांना दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ सराफास कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. 

चोरट्यांच्या शोधासाठी सांगलीहून श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञ व स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकास पाचारण करण्यात आले. श्‍वान जवळच्या रस्त्याने जात शंभर फुटावर घुटमळले. उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, भिलवडीचे सहायक निरिक्षक कैलास कोडग, विशाल जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पुढील तपासाच्या सूचना दिल्या. भिलवडी ठाण्याकडील माहितीनुसार चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 9 लाख 91 हजार पाचशे इतकी आहे. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. 

मध्यवस्तीत चोरी, सीसी टीव्ही नाही 
संबंधित यांचे घर गावच्या मध्यवस्तीत आहे. समोरच एका बॅंकेची शाखा आहे. मात्र येथे सीसीटीव्ही कार्यरत नाही, त्यामुळे चोरट्यांना पकडणे पोलिसांना आव्हान असणार आहे. मध्यवस्तीतील या चोरीच्या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे. 

संपादन : युवराज यादव