Video : ...तर "बीसीजी' भारतासाठी तारक ठरेल !

031_May_Khochikar_1.jpg
031_May_Khochikar_1.jpg

सांगली : जगभरात सध्या कोरोना साथीचे थैमान सुरू आहे. जगाच्या तुलनेत भारतातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आहे. त्यामागच्या काही कारणांपैकी एक कारण भारतात व्यापक प्रमाणावर राबवली जाणारी "बीसीजी' लसीकरणाची मोहीम असावी, असा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरॉलॉजिस्ट डॉ मकरंद खोचीकर यांनी "सकाळ'शी बोलताना आज व्यक्त केले. डॉ. खोचीकर यांच्याशी अमेरिका,युरोप आणि ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय तज्ज्ञ-संशोधकांसोबत याबाबत सतत चर्चा-संवाद सुरु आहे. अमेरिकेतील "एफडीए'ने या स्वरूपाच्या वैद्यकीय चाचण्यांना संमती दिली आहे.

डॉ. खोचीकर म्हणाले, ""जगभरात कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. चीननंतर आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि इटली या प्रगत देशांनी यात मृत्यूचा उच्चांक गाठला आहे. भारतात बाधितांची संख्या किती याबद्दल दुमत असू शकते. कारण लॅब टेस्ट कमी होताहेत. त्यामुळे बाधितांची नेमकी संख्या कदाचित कमी दिसत असेल. मात्र जे बाधित आहेत, त्यापैकी मृत्यूचे प्रमाणही जगाच्या तुलनेत कमी आहे. असे का असावे, याबद्दल जगभरातील वैद्यकीय थिंक टॅंकमध्ये विचार-संवाद सुरू झाला आहे. त्यांच्या मते भारतातील "बीसीजी' लसीकरणाची सुमारे सत्तर वर्षांपासूनची व्यापक मोहीम हे यामागचे एक कारण असावे. याच अनुषंगाने जगभरातील युरॉलॉजिकल ऍन्कालॉजिस्ट एकमेकांच्या संपर्कात आहेत. मी ज्या वैद्यकीय शाखेत काम करतो त्या मुत्राशयाच्या (ब्लॅडर) कर्करोगाच्या उपचार पद्धतीत आम्ही "बीसीजी' लसीमधील औषधांचा थेट वापर रुग्णांसाठी करीत असतो. त्वचेच्या कर्करोगात त्वचेमध्ये तर मुत्राशयाच्या कर्करोगात औषध स्वरूपाने (इंट्राव्हसायकल थेरपी) "बीसीजी' लसीमधील औषधांचा वापर होतो. कर्करुग्णांची प्रतिकार क्षमता वाढीसाठी ही औषधे वापरली जातात. त्यामुळे इंटरनॅशलन ब्लॅडर कॅन्सर कन्सॉर्टीयमचे सदस्य म्हणून या विषयातील सर्व तज्ज्ञांशी माझी सतत गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. आपल्याकडे जन्मानंतर काही दिवसातच "बीसीजी' लसीकरण केले जाते. या लसीकरणाचा मोठा इतिहास आपल्याकडे आहे. विशेषतः देवी, टीबी, पोलिओ अशा रोगांचे उच्चाटन करण्यात भारताला आलेले यश पाहता भारतीयांची रोग प्रतिकारक क्षमता चांगल्या पद्धतीने वाढल्याचे दिसून आले आहे. याउलट इटली, युरोप आणि अमेरिकेमध्ये या रोगांचे उच्चाटन झाल्याने खूप आधीपासून हे लसीकरण आता थांबवले आहे. इराणसारख्या देशात 1984 नंतर सुरू झाले आहे. त्यामुळे त्याआधीच्या लोकांमध्ये "कोरोना'चा मोठा प्रादुर्भाव असू शकतो. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतातील या लसीकरणाचे फायदे होत असावेत, असे प्राथमिक निष्कर्ष आहेत. अर्थात हे संशोधन प्राथमिक पातळीवर आहे. मात्र याला दुजोरा देत अमेरिकेच्या "एफडीए'ने आणि युरोपमध्येही क्‍लिनिकल ट्रायल सुरु केल्या आहेत. त्याचे निष्कर्ष यथावकाश पुढे येतील. त्यानंतर नेमके भाष्य करता येईल.''

डॉ. खोचीकर म्हणाले, ""भारतातील कोरोना बाधितांमधील मृत्यूदर कमी असण्यामागे अन्यही कारणे असावीत. विशेषतः साधारण आठ अंश तापमानातील देशांमध्ये मृत्यू दर जास्त दिसून येत आहे. आपल्याकडे सध्या असलेले तापमानही पथ्यावर पडत असावे. नैसर्गिक आणि विकसित झालेली अशा दोन प्रकारची रोग प्रतिकार क्षमता माणसात असते. भारतात सतत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव असल्याने त्यासाठी आपोआप विकसित रोग प्रतिकार क्षमता वाढत राहते. परिणामी भारतीयांची विकसित प्रकारातील प्रतिकार क्षमताही तुलनेने जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळेही मृत्यू दर कमी असावा. सध्या जगभरात "कोविड' विषाणूचे "एस' आणि "एल' असे दोन प्रकार दिसून आले आहेत. त्यापैकी "एल' टाईपचा कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव जलद गतीने होत असतो. आपल्याकडे संक्रमित होत असलेला विषाणू "एस' टाईपचा असावा. अर्थात आपल्याकडील बाधितांच्या विषाणूंचे "आरएनए' विश्‍लेषण केल्यानंतरच ते स्पष्ट होईल. ते सध्या अजूनही झालेले नाही. मृत्यू दर कमी असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यावर पुढील काळात संशोधन होत राहील. आपल्याकडे सध्या कोरोनाबाधितांना मलेरिया उपचारातील हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन औषधांचा वापर सुरू आहे. हिंवतापाचे रुग्ण आपल्याकडे सर्रास दिसतात. त्यामुळे विकसित रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली असावी. या सर्वच निष्कर्षांना वैद्यकीय संशोधनाची आणि आकडेवारीची जोड द्यावी लागेल. त्यादृष्टीने जगभरात आणि आपल्याकडेही अभ्यास सुरु झाला आहे. ''

डॉ. खोचीकर म्हणाले, ""क्षयरोग प्रतिबंधक लस बीसीजी लस ही लस प्रामुख्याने क्षयरोग (टीबी) साठी वापरली जाते. ज्या देशात क्षयरोगाची लागण व्हायची शक्‍यता आहे तेथे निरोगी बालकांमध्येही जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते. बीसीजीची परिणामकारकता टीबी आजाराबरोबरच अन्य व्हायरल संसर्ग आणि बॅक्‍टेरियल संसर्गासाठीही आहे. त्याचआधारे मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचाराचा भाग म्हणून ती वापरली जाते. त्याचा उत्तम परिणाम मिळतो. क्षयाव्यतिरिक्त अन्य विषाणूंच्या संसर्गामध्येही सुमारे 30 ते 35 टक्के प्रतिबंधाचे काम ही लस करते. ही लस प्रथम 1921 मध्ये वैद्यकीय पद्धतीने वापरली गेली. 2004 पर्यंत जगभरात सुमारे 100 दशलक्ष मुलांना दरवर्षी ही लस दिली जात होती. भारतातील व्यापक लसीकरणाचा भाग म्हणून ही लस दिली जाते. भारतासह विकसनशील आणि अविकसित देशांना सध्याच्या कोरोना संकटात बीसीजी लसीकरणाची पूर्वापार व्यापक मोहीम आधार ठरु शकते, असा प्रगत देशातील वैद्यकीय संशोधकांना वाटते. ज्या देशांमध्ये बीसीजी लस दिलेली नाही तेथे सध्याच्या परस्थितीत ही लस देता येईल का यावर विचार सुरु आहे. कारण सध्या कोरोनावर थेट अशी कोणतीही लस किंवा उपाय उपलब्ध नाही. ज्यांना पूर्वी बीसीजी लस दिली आहे, त्यांना पुन्हा लस देणे फायद्याचे ठरेल का यावर विचार सुरु आहे. मात्र तूर्त सोशल डिस्टन्सींगसह प्रचलित असलेल्या सर्व उपायोजना सुरुच ठेवणे अत्यावश्‍यक असेल. त्यात कोणतीही तडजोड उपयोगाची नाही.''

डॉ. खोचीकर म्हणतात...
- "बीसीजी' लसीकरणामुळे भारतीयांची रोग प्रतिकारक क्षमता अधिक
- बीसीजीची परिणामकारकता टीबी आजाराबरोबरच अन्य व्हायरल संसर्ग आणि बॅक्‍टेरियल संसर्गासाठीही
- भारतासह विकसनशील आणि अविकसित देशांसाठी बीसीजी मोहीम आधार ठरेल
- भारतात सतत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव असल्याने रोग प्रतिकार क्षमता वाढते
- भारतातील कोरोनामुळे मृत्यूदर कमी असण्यामागे तापमानही पथ्यावर
- "कोविड' "एस' टाईपचा असावा, त्यामुळे मृत्यू दर कमी असू शकतो  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com