.... तर सांगलीत २० पासून अंशतः व्यवहार शक्य

then partial transaction is possible sangli
then partial transaction is possible sangli
Updated on

सांगली : गेले 22 दिवस संपूर्ण देश, राज्य आणि सांगलीकर लॉकडाऊनमुळे घरात बंद आहेत. या सगळ्यांना थोडासा दिलासा देणारी बाब 20 एप्रिलनंतर घडू शकते. इस्लामपूर वगळून जिल्ह्यातील व्यवहार काही प्रमाणात टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाण्याची शक्‍यता आहे, असे सूतोवाच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आज यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

"कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल, तर केंद्राने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील "कोरोना' संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी "कोरोना'चे रुग्ण नसतील, तेथे शेती, औद्योगिक वसाहती आणि छोटे रोजगार करणाऱ्या लोकांना दिलासा देता येईल, या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी याबाबत म्हणाले, ""दोन दिवसांतच जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक बोलावली आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगार, उद्योगांचा आढावा घेऊन याबाबत राज्य सरकारकडे अहवाल पाठवणार आहोत. त्यानंतर येणाऱ्या सूचनेनुसार अंशतः व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय होऊ शकेल.'' याबाबतचा निर्णय आम्ही सर्व माध्यमांना बोलावून जाहीर करणार आहोत. त्यामुळे येत्या 20 एप्रिलपासून व्यवहार हमखास सुरू होतीलच, असा समज जनतेने करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. 

पत्रकारांनी त्यांना लोकांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. प्रामुख्याने शेतकरी, भाजीपाला, द्राक्षे व इतर फळे यांच्या वाहतुकीबाबतच्या अडचणी मांडल्या. शेतात अडकून पडलेला शेतमाल, पडलेले दर, शेतकऱ्यांचे नुकसान यावर उपाययोजना करावी, असा या संवादाचा सूर होता. शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाला योग्य तो भाव मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

डॉ. चौधरी म्हणाले, ""शेतमालाच्या वाहतूक, विक्रीसाठी परवानगी दिली आहे. तरीदेखील काही अडचणी असतील, तर त्या तातडीने सोडवल्या जातील. शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते, पेट्रोल-डिझेल मिळण्याबाबतही उपाययोजना करू.'' ते म्हणाले, ""प्लंबर, वायरमन, फिटर यांच्यासह विविध सुविधा पुरवणाऱ्यांनाही परवानगी कशी देता येईल, याबाबत आम्ही आराखडा तयार करीत आहोत. गरजेच्या वस्तू व्यावसायिकांचाही विचार होऊ शकतो.'' हॉटेल चालकांना होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे. तसे काहींनी सुरू केले आहे. घरपोच धान्य देण्यासाठी काही व्यापाऱ्यांना परवानगी दिली आहे. मात्र, जोपर्यंत जिल्ह्याचा अभ्यास पूर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन पूर्ण हटवता येणार नाही. व्यवहार अंशतः सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, ""गर्दी होऊ शकते, सामाजिक अंतर राखले जाऊ शकणार नाही, अशा ठिकाणी "कोरोना'चा प्रादुर्भाव व प्रसार होण्याचा धोका आहेच. त्यामुळे अशा ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. इस्लामपूर वगळता जिल्ह्यात अंशतः व्यवहार सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यात "कोरोना'चा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. ज्याठिकाणी हॉट स्पॉट आहेत, त्याठिकाणी अधिक खबरदारी घेतली जाईल. परदेशवारी करून आलेल्यांना होम क्वारंटाईनसह इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे.'' 

अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न
"सकाळ'ने 12 एप्रिल रोजी "उद्धवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही...' या विशेष संपादकीयद्वारे ज्याठिकाणी कोरोना संकट नाही, त्याठिकाणी व्यवहार सुरू करण्यासाठी अंशतः शिथिलता आणावी. जेणेकरून रोजगार सुरू होतील, शेतीचे नुकसान होणार नाही, अशी काळजी घेणारी भूमिका मांडली होती. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी देखील माध्यमांकडून परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. लोकांच्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती घेतली. लोकांच्या अडचणी आणि गरजा समजावून घेऊन नियमांच्या अधीन राहून त्या कशा सोडवता येतील यावर विचार करीत असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com