esakal | पारधी समाजाच्या 45 मुलांच्या जन्माच्या नोंदींच नाहीत...कुठे?

बोलून बातमी शोधा

पारधी समाजाच्या 45 मुलांच्या जन्माच्या नोंदींच नाहीत...कुठे?

पारधी समाजातील लोकांच्या अज्ञानाने जन्माला घातलेल्या तब्बल 45 मुलांच्या जन्मांच्या नोंदीच केल्या नाहीत. आदिवासी पारधी समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे ही बाब उजेडात आली आहे.

पारधी समाजाच्या 45 मुलांच्या जन्माच्या नोंदींच नाहीत...कुठे?
sakal_logo
By
विनोद शिंदे

मिरज : पारधी समाजातील लोकांच्या अज्ञानाने जन्माला घातलेल्या तब्बल 45 मुलांच्या जन्मांच्या नोंदीच केल्या नाहीत. आदिवासी पारधी समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे ही बाब उजेडात आली आहे. या नोंदी करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याला शासनस्तरावर योग्य प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा या समाज बांधवांच्या कडून व्यक्त होत आहे. 

पारधी समाजाची संख्या तशी तालुक्‍यातील लक्षणीय आहे. शासकीय कार्यालयासमोरील त्यांच्या आंदोलनाची स्टाईल असो किंवा गजबजलेल्या ठिकाणांची भांडणे अथवा संवाद बघितल्याने शासकीय अधिकारी व सामान्य माणूस चार हात लांब राहण्याचेच पसंत करतो. सध्या या समाजातील काही शिक्षित युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला आहे. यातूनच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी ते धडपडत आहेत. यात मोठी अडचण झाली आहे ती मुलांच्या जन्माच्या नोंदींच नसल्याची. बहुतांशी वेळा मुक्काम पडेल त्याच ठिकाणी बाळंतपण होणे याचबरोबरीने अंधश्रद्धा हेही कारण जन्माच्या नोंदी न होण्यामागे आहे.

या विषयासाठी सेवा संस्थेचे अध्यक्ष नागेश पवार आणि त्यांचे सहकारी गावा- गावांतील पारधी तांड्यावर फिरत आहेत. शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी धडपडत आहेत. बऱ्याच कुटुंबातील लोकांच्या शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदान नोंदणी झालेली नाही. या त्यांच्या रहिवासी पुराव्याच्या कागदपत्रापासून ते वंचित आहेत. ही कागदपत्रे नसल्याने शासकीय योजनांच्या लाभापासून त्यांना मुकावे लागत आहे. पारधी समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पाऊले उचलने गरजेचे आहे. समाजातील भावी पिढी समृद्ध होण्यासाठी नागेश पवार सारखे युवक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. 

जन्माच्या नोंदी नसलेली गाव निहाय आकडेवारी 

 1. आरग - 13 
 2.  नरवाड - 6 
 3. मालगाव - 5 
 4. मानमोडी - 6 
 5. बिसूर - 3 
 6. धूळगाव - 3 
 7. म्हैसाळ - 2 
 8. सोनी - 2 
 9. कांचनपूर - 2 
 10. लक्ष्मीवाडी - 1 
 11. विजयनगर - 1 
 12. मिरज - 1 

कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न

मिरज तालुक्‍यातील पारधी समाजाच्या पिवळ्या शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्मतारखेचे दाखले, राहण्यासाठी जागा या मागण्या प्रलंबित आहेत. काही कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील आहे. यात जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून न्याय द्यावा. 

- नागेश पवार, अध्यक्ष, आदिवासी पारधी समाज सेवा संस्था.