सातारा जिल्ह्यात 48 तासात अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केेले आहे.

सातारा : केंद्रीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील 48 तासात काही ठिकाणी जोरदार तर घाट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. सध्या जिल्ह्यातील कोयना, वीर, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी इत्यादी प्रमुख धरणे 100 टक्के भरलेली आहेत.

सद्यस्थितीत धरणक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोयना धरणातून 72 हजार 398 क्युसेक्स, वीर धरणातून 32 हजार 509 क्युसेक्स, कण्हेर धरणातून 1 हजार 627 क्युसेक्स तसेच उरमोडी धरणातून 1 हजार 836 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

तरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये. विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There may be heavy rainfall in Satara district