esakal | गटातटाच्या राजकारणामुळे तोड नाही, ऊसाला आले तुरे 

बोलून बातमी शोधा

There is no compromise due to factional politics}

वाळवा तालक्‍यातील रेठरेहरणाक्षपासून नरसिंहपूरपर्यंतच्या ऊस क्षेत्र असलेल्या पट्टयात आडसाली खोडव्यासह सुरुच्या लागतीला सर्रास तूरे आले आहेत. त्यामुळे एकरी उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

paschim-maharashtra
गटातटाच्या राजकारणामुळे तोड नाही, ऊसाला आले तुरे 
sakal_logo
By
शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड : वाळवा तालक्‍यातील रेठरेहरणाक्षपासून नरसिंहपूरपर्यंतच्या ऊस क्षेत्र असलेल्या पट्टयात आडसाली खोडव्यासह सुरुच्या लागतीला सर्रास तूरे आले आहेत. त्यामुळे एकरी उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. संबंधित साखर कारखान्यांनी तत्काळ ऊस तोडी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. 

परिसरातील ऊस पिकावर नजर टाकली असता पिकास तुरे आल्याने ऊसात दशी निर्माण झाली आहे. पाण्याच्या अभावानेही पिकाची वाढ खुंटून, आतून ऊस पीक पोकळ होऊन चिपाडे तयार झाली आहेत. पीक परिपक्व झाले आहे. पिकाला अनसा आल्याने महिनाभरात तोडी झाल्या नाहीत, तर एकरी उत्पन्न घटल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

ऊस तोडणी देताना गटातटाचे राजकारण आड येऊन, तोंडे पाहून तोडी दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. कारखान्यांचा तोडणी कार्यक्रम कागदावर राहिला असून सामान्य शेतकरी अदखलपात्र झाला आहे. तोडणी मजूर ऊस तोडीसाठी पैसे मागत आहेत. कारखाना व्यवस्थापनाचे याप्रकरणी दुर्लक्ष होत आहे. 
भागातील सर्वाधिक ऊस कृष्णा कारखान्याकडे नोंद आहे. दरवर्षी राजारामबापू, हुतात्मा, क्रांती साखर कारखान्यात ऊस तोडीसाठी स्पर्धा असायची. कोरोनामुळे चालू वर्षी कमी ऊस तोडणी मजूर आल्याने मजुराअभावी कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळली आहे. ऊस तोडीत स्पर्धा दिसून येत नाही. 

गुऱ्हाळाकडे ऊस पाठविण्यास शेतकरी पसंती देऊ लागला असला, तरी एफआरपी इतका दर मिळत नसल्याने हा सौदाही घाट्याचा ठरत आहे. कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रणा गतिमान करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार