सांगली जिल्ह्यात तुर्त लॉकडाऊन नाहीच; पालकमंत्री-जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 

विष्णू मोहिते
Saturday, 18 July 2020

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी सुरक्षित अंतरासह कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे. प्रशासकीय यंत्रणा त्याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले

सांगली, ः समाजमाध्यमांवर जिल्ह्यात मंगळवारपासून ( ता. 21) शंभर टक्के लॉकडाऊनचे संदेश फिरत आहेत. त्यावर आज सकाळी पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तातडीने खुलासा करीत असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या नावाचा हवाला देऊन असे संदेश पसरत असून त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी सुरक्षित अंतरासह कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे. प्रशासकीय यंत्रणा त्याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले

पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी ( ता. 16) जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झूम द्वारे संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करु नये, पण कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची, सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. तथापि जिल्ह्यात मंगळवारी ( ता. 21) पासून 31 जुलै पर्यंत शंभर टक्के टाळेबंदीच्या अफवा पसरत आहेत. अशा संदेशावर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये, हे असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे . त्याच वेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्‍यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लॉकडाउन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. 

 
"" टाळेबंदीचा विचार नाही. तशी अद्याप वेळ आलेली नाही. निर्णय घेतला तरी घाईगडबडीने होणार नाही. पुरेसी पुर्वकल्पना देऊनच प्रशासन योग्य ते निर्णय घेत असून यापुढेही तेच धोरण कायम राहील. नागरिकांनी संयम ठेवून नियमांचे काटेकोर पालन करावे. ही वेळ सावधान वर्तनाची आहे. '' 
डॉ.अभिजित चौधरी 
जिल्हाधिकारी,सांगली 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no immediate lockdown in Sangli district; Explanation of the Guardian Minister-Collector