esakal | गुंतवलेल्या रकमेचा परतावा नाही ; सांगलीतील तरुणाची फसवणूक; नऊ जणांवर गुन्हे

बोलून बातमी शोधा

There is no refund of the amount invested; Cheating of youth in Sangli; Crimes against nine people

सांगलीतील तरुणाची गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा न देता 5 लाख 81 हजार 821 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

गुंतवलेल्या रकमेचा परतावा नाही ; सांगलीतील तरुणाची फसवणूक; नऊ जणांवर गुन्हे
sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : सांगलीतील तरुणाची गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा न देता 5 लाख 81 हजार 821 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी विनायक बाळासाहेब शिंदे (वय 29, रा. मंगलमूर्ती कॉलनी, प्रेरणा अपार्टमेंट, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी फिर्यादीनुसार नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सूरज अजित पवार (रा. निमसोड), सचिन पावसे (रा. वेणेगाव, जि. सातारा), अक्षय राजेंद्र शिंदे (रा. कऱ्हाड), राजेंद्र तुकाराम कोरडे (रा. उस्मानाबाद), अमोल राजाराम जगताप (रा. पूर्व मुंबई), मनोजकुमार भिकू बिरनाळे (रा. वाई, जि. सातारा), सूरज तानाजी पाटील (रा. अकनूर, ता. राधानगरी), नानासाहेब मल्हारी जगताप (रा. सातारा), सचिन शिवाजी कापसे (रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी विनायक शिंदे हे मंगलमूर्ती कॉलनीत राहतात. संशयित सचिन कापसे हा त्यांचा मित्र आहे. तर संशयित आरोपी कापसेच्या परिचयाचे आहेत. शिंदे आणि संशयित आरोपी यांचा परिचय नाही. कापसेने शिंदे यांना क्रिएटिव्ह एम्पायर, कराड या नावाची कंपनी असून या कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर कंपनी एका महिन्यात 20 टक्के परतावा देत असल्याचे सांगितले.

या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी शिंदे यांना तयार केले. शिंदे यांनीही कापसेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बॅंकेतून कर्ज काढून 7 लाख रुपये कंपनीत गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर शिंदे यांना एक महिन्याचा परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही. 


गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने शिंदे यांनी कापसे व संशयित आरोपींशी फोनवरून विचारणा केली. यावेळी संशयितांनी शिंदे यांना कंपनी बंद पडल्याचे सांगितले. थोडे दिवस थांबा तुम्हाला परतावा देतो असे आश्‍वासन देऊन पैसे देण्यास चालढकल केली. 9 महिने झाले तरीही शिंदे यांना परतावा मिळाला नाही.

अखेर फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांत फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस विलास मुंढे अधिक तपास करत आहेत. 

संपादन : युवराज यादव