ग्रामीण भागात एसटी नाही; शाळेत कसे जायचे? 

निरंजन सुतार
Saturday, 13 February 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मिरज पूर्व भागतील पाचवी ते बारावी चे नियमित वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील रा. प. महामंडळाच्या बसेस शालेय वेळेत सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विंध्यार्थी बस अभावी शिक्षणापासून वंचित राहिला आहे.

आरग : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मिरज पूर्व भागतील पाचवी ते बारावी चे नियमित वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील रा. प. महामंडळाच्या बसेस शालेय वेळेत सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विंध्यार्थी बस अभावी शिक्षणापासून वंचित राहिला आहे. त्वरित बस सुरू करावी. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी आरग परिसरातील शाळांनी एसटी महामंडळ मिरज ग्रामीण विभागाकडे केली आहे. 

आरग येथील शाळा व महाविद्यालयात सुमारे दररोज अडीच हजारहून अधिक विद्यार्थी नियमात शिक्षण घेतात. शिक्षण घेण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी बाहेरील गावाहून आरग येथे येतात. शिंदेवाडी, लिंगणुर, खटाव, लक्ष्मीवाडी, बेडग व मधला फाटा ( कत्तलखाना ) या मार्गावर शालेय वेळेत बस फेऱ्या वाढवाव्यात. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र, बसफेऱ्या कमी असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असून हाल होत आहे. 

शेकडो विद्यार्थ्यांनी बस नसल्याने शाळेत न जाण्याचेच पसंती केले आहे. शाळेत कसे जायचे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असणारी एस. टी अद्याप बंद असल्याने आरग परिसरातील शेकडो विद्याथी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. 

शालेय वेळेत बस सुरू करण्याची मागणी तीन महिन्यापासून आहे. एसटी महामंडळ मिरज ग्रामीण विभागाला वारंवार लेखी सूचनाही दिल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी एसटी सुरू करावी. 
- दिलीप हुक्कीरे, मुख्याध्यापक आरग हायस्कूल 

कोरोना मुळे विस्कळीत झालेली बस सेवा पूर्वपदावर येत आहे. आरग मार्गावर सध्या बस फेऱ्या सुरू आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता शालेय वेळेत बस सोडण्यात येतील. 
- शिवाजी खांडेकर, आगार प्रमुख मिरज 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no ST in rural areas; How to go to school