इस्लामपुरात जाणवतोय अँटिजेन टेस्ट कीटचा तुटवडा 

धर्मवीर पाटील
Monday, 24 August 2020

कोरोनाशी संबंधित करावयाच्या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी लागणाऱ्या कीटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आरोग्य विभागाकडून जे आरटीपीसीआर टेस्ट घेतल्या जात आहेत.

इस्लामपूर : कोरोनाशी संबंधित करावयाच्या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी लागणाऱ्या कीटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आरोग्य विभागाकडून जे आरटीपीसीआर टेस्ट घेतल्या जात आहेत. त्याचेही अहवाल मिळण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी घेतला जात आहे. तालुकास्तरावर इस्लामपूरसारख्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. 

वाळवा तालुका आरोग्य विभागाकडील रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी लागणारे कीट संपून तीन दिवस झाले आहेत. संबंधित विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे, सोमवारपर्यंत मिळतील. प्रत्यक्षात हाय रिस्क असलेले रुग्ण किंवा पन्नास वर्षे वय व त्यावरील संभाव्य रुग्णांच्या चाचणीसाठी हे कीट वापरावयाचे आहेत. मात्र पुरेशा प्रमाणात त्याचे वाटप झालेले नसल्याची स्थिती आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशा चाचण्या केल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते, मात्र पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे ते ही होऊ शकलेले नाही. ग्रामीण भागातील किंवा ज्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात असणारी गरज विचारात घेऊन अशा किट्‌सचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. आरटीपीसीआरच्या ज्या टेस्ट याआधी घेतल्या जात होत्या त्यांचा अहवाल तिसऱ्या दिवशी येत असे, मात्र सध्या याच अहवालाला पाच दिवस किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. तोपर्यंत रुग्णांची अवस्था वाईट होत आहे. या टेस्ट व रिपोर्ट लवकरात लवकर मिळावेत यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a shortage of antigen test kits in Islampur