माढा तालुक्यात कामधंदा नसल्याने नवरीही मिळेना

अक्षय गुंड 
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

पावसाळ्यात देखील पावसाचा थांगपत्ता नसल्याने निर्माण झालेल्या महाभयंकर दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प  झाली आहेत. युवक व मजुरांच्या हाताला काम मिळेना झाले आहे. 

उपळाई बुद्रूक(माढा, सोलापूर) : पावसाळ्यात देखील पावसाचा थांगपत्ता नसल्याने निर्माण झालेल्या महाभयंकर दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प  झाली आहेत. युवक व मजुरांच्या हाताला काम मिळेना झाले आहे. परिणामी सुशिक्षीत बेरोजगारांनाही नोकरी नसल्याने मुलांची लग्ने जमेना. त्यामुळे हे युवक नैराश्याने व्यसनाधिन होत असुन बहुतांश गावातील तरूण शहराकडे स्थंलातर होत असल्याचे चित्र माढा तालुक्यात दिसुन येत आहे.

गेली चार ते पाच वर्षं सातत्याने माढा तालुक्यातील नागरिक दुष्काळाचे संकट सोसतात. कधी चारा, कधी पाणी तर नेहमीच रोजगाराचा प्रश्न 'आ' वासुन पडलेला आहे. विहरीत पाणी नसल्याने रानात पिके नाहीत, राने बोडकी पडली. दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवावर घाव घालतोच त्याचबरोबर अनेक समस्याही निर्माण होत आहेत. त्याचे परिणाम शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागत आहेत. नापिकीमुळे पैसे हातात नाहीत. पिण्याच्या पाण्याची होरपळ. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावर होत आहे. त्यामुळ प्रत्येक गावात तरूणांचे असे घोळके रिकामे असल्याचं चित्र दिसतंय. मुलांच्या हाताला काम नाही, कित्येकांचं शिक्षण सुटलय. वयही वाढतय. पालक आणि मुल सगळेच वैतागले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे युवकांच्या हाताला काम धंदा नाही. शासनही कामे उपलब्ध करून देईनासे झालयं.                             

''शहरातील एखाद्या कामगाराला मुलगी मिळेल, पण ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळण कठीण झालयं. लोकप्रतिनिधीही युवकांच्या हाताला काम मिळेल असे काही उद्योगधंदे सुरू केलेले नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती, पाणी, युवकांच्या हाताला नसलेले काम व त्यात लग्नाचे होऊन चालले वय व त्यात मिळत नसलेली नवरी मुलगी यामुळे ग्रामीण भागातील युवक पुरते वैतागले असुन व्यसनाधीनतेकडे पाऊल टाकत असुन खेड्यातून शहराकडे स्थंलातर होत आहेत.

''युवकांसमोर बेरोजगारांचा प्रश्न गंभीर असुन शासनाने ग्रामीण भागाताच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावेत. कामधंदा नसल्याने युवक व्यसनाधीन होत असुन, वाईट गोष्टींकडे वळत आहेत.'' 
- विशाल जाधव, युवक, उपळाई बुद्रूक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was no marriage of you as there was no work in Madha Taluka