उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार देणार : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

दीपक पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षातील सर्वांशी बोलून निर्णय घेतला जाईल.

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे अनेक सक्षम कार्यकर्ते आहेत; पण सर्वांशी विचारविनिमय करून लोकसभेला उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार दिला जाईल. श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणाचे नाव पुढे येईल, यावर अधिक बोलणे टाळत आम्ही योग्य उमेदवार देऊ, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सध्या शरद पवार हे सरकारच्या चुकांवर बोट ठेवू लागल्याने जनतेतून सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यातून राष्ट्रावादीला ताकद देण्याची भूमिका निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र बदललेले दिसेल आणि पक्ष सोडून गेलेल्यांना पश्‍चाताप होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

श्रीवर्धन येथे शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी जाताना उशीर झाल्याने जयंत पाटील आज सायंकाळी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात थांबले. या वेळी त्यांनी सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाबाबत जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकाऱ्यांशी कमराबंद चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
सत्तेत नसले, की कामे होत नाहीत म्हणून सत्तेसोबत गेल्याचे काही जण सांगत आहेत, या प्रश्‍नावर जयंत पाटील म्हणाले, ""सत्तेत असताना सर्वांची कामे होतात. मात्र, विरोधात असतानाही कामे होतात; पण बेकायदेशीर कामे होत नाहीत. कामे होणे महत्त्वाचे नाही, विचार कोणता आणि कोणती तत्त्वे घेऊन तुम्ही लढताय यावर सर्व अवलंबून आहे. कोणत्या विचाराला जनतेचे समर्थन मिळतंय हे पाहून पाऊल टाकले पाहिजे. त्यामुळे पुढारी बदलले तरी जनता आपली मते बदलणार नाहीत.'' 
निवडणुकीसाठी वंचित आघाडीसोबतची चर्चा पूर्ण झाली का, या प्रश्‍नावर श्री. पाटील म्हणाले, ""कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्याबाबत मला नक्की सांगता येणार नाही. वंचित आघाडीतील बरेच लोक कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटायला लागली आहेत. त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. आपल्या प्रयत्नांनी कुठेतरी भाजपला मदत होतेय हे त्यांच्या लक्षात आले आहे.'' 
दीपक पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर ते म्हणाले, ""अद्यापपर्यंत तरी ते भाजपमध्येच आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षातील सर्वांशी बोलून निर्णय घेतला जाईल.'' 

पक्ष प्रवेशानंतरच बुके... 

दीपक पवार हे पुष्पगुच्छ घेऊन जयंत पाटील यांचे स्वागत करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आले होते. मात्र, आपला अजून राष्ट्रवादीत प्रवेश झालेला नाही. त्यामुळे प्रवेशानंतरच तुमचा बुके आम्हाला स्वीकारता येईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे श्री. पवार आपल्या समर्थकांसह निघून गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be capable candidate against Udayanraje says Jayant Patil