Vidhan Sabha 2019 ...म्हणून महाराष्ट्राची जनता कॉंग्रेस - राष्ट्रवादीला धूळ चारेल ; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी संवाद साधला.

कऱ्हाड ः महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील लोक आरोपाने बरबटलेले असून अशा लोकांना मतदार पुन्हा निवडून देणार नाहीत. त्यांनी सत्तेत राहून 20 वर्षे स्वतःसाठी राजकारण केले आहे. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरोप नसलेले मुख्यमंत्री असून त्यांच्या सहकारी मंत्र्यांवरही आरोप नाहीत. त्यामुळे लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या भाजप महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने पुन्हा येईल, असा विश्‍वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

कऱ्हाड दक्षिण विधानसभेचे भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ डॉ. सावंत येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, देशात भाजपचे सरकार असून विकास व्हायचा असेल तर राज्यातही पुन्हा भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. भाजपचे राजकारण हे लोकांसाठी आहे. पाच वर्षे भाजपने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांमुळे लोक आज भाजपच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रात भाजपला वातावरण चांगले आहे. राज्यातील तरुण भाजपकडे आकर्षित होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही तरुण असून त्यांनी आखलेल्या योजना तरुणांसाठी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त युवक भाजपला पसंती देतात. 

देशातील आर्थिक मंदीच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, आर्थिक मंदी केवळ भारतात नसून जगभर आहे. बेरोजगारीत बदल सुरू झाला आहे. केंद्राचे देशपातळीवर होणारे वेगवेगळे निर्णयामुळे अर्थनीतीत देशाला, राज्याला फायदा होणार आहे. देशात विकासाची अनेक साधने असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्रात व राज्यात पाच वर्षांत वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे पर्व औद्योगिकीकरणाचे आहे. त्यात युवक हा केंद्रबिंदू मानून काम सुरू आहे. त्यामुळे बेरोगजारीचा प्रश्‍न मार्गी लागेल.

राफेलच्या पूजनावर ते म्हणाले, दसऱ्याला प्रत्येकजण शस्त्राचे पूजन करतो. तसेच राफेलचे पूजन केले तर बिघडले कुठे. राफेल हे देशाचे शस्त्र आहे. त्यामुळेच संरक्षण मंत्र्यांनी त्याचे पूजन केले. 

कोल्हापूरपासून प्रचार दौरा.... 

महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यास कोल्हापूरपासून सुरवात झाल्याचे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, दक्षिण कोल्हापूर, इचलकरंजी येथे युवा संवाद झाला. एक प्रचारसभाही झाली. कऱ्हाडमध्ये काल रात्री येऊन कऱ्हाड, सातारा येथील मित्रांशी चर्चा केली आहे. कऱ्हाड व सातारा येथे आज (शुक्रवार) प्रचार करणार असून त्यानंतर सांगली येथे प्रचारासाठी जाणार आहे. उद्यापासून (शनिवार) दोन दिवस मुंबईत प्रचारासाठी जाणार असून आवश्‍यकता भासल्यास महाराष्ट्रात प्रचार करेन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... therefore, the people of Maharashtra will not support Congress and Ncp says Goa CM