त्या दोघी बनवतात पानाचा विडा, 400 प्रकारचा, पण कलकत्ता पानच येईना ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

अनिता आणि सरस्वती यांनी अतिशय धाडसाने एक प्रयोग केला. या दोघी मूळ शिक्षिका, मात्र त्यांनी पानपट्टीचा व्यवसाय सुरु करायचा ठरवला. सांगलीत आपटा पोलिस चौकीजवळ पान मंदिर नावाने पानपट्टी सुरु केली.

 

सांगली ः त्या दोघी पानपट्टी चालवतात... तब्बल चारशे प्रकारचे विडे बनवतात... पानपट्टीचे नाव ठेवलेय, पान मंदीर... पण, कोरोना संकट काळात त्यांच्या व्यवसायावरही मोठे संकट आले आहे. त्यांना विडा बनवण्यासाठी लागते कलकत्ता पान. ते आता बंदच आहे. तोवर विडा बनवायचा कसा, हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे.

पानपट्ट्या सुरु झाल्या, तेथे मावा विकला जातो... आम्ही तसला प्रकार करत नाही, आम्ही फक्त स्वीट पान विकतो आणि त्याला फक्त कलकत्ता पान लागते. ते येईपर्यंत "विडा बंदी' असेल, असे अनिता आवटी आणि सरस्वती आवटी या सख्या जाऊबाई हताशपणे सांगतात. 

अनिता आणि सरस्वती यांनी अतिशय धाडसाने एक प्रयोग केला. या दोघी मूळ शिक्षिका, मात्र त्यांनी पानपट्टीचा व्यवसाय सुरु करायचा ठरवला. सांगलीत आपटा पोलिस चौकीजवळ पान मंदिर नावाने पानपट्टी सुरु केली. तेथे फक्त स्विट पान त्या विकतात. तंबाखूयुक्त पानाला त्यांच्याकडे मज्जाव आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल चारशे प्रकारचे पान त्या बनवतात. इतकी प्रचंड व्हरायची असणारे बहुदा सांगलीतील हे एकमेव पान सेंटर असावे, त्यात महिला संचालक असल्याने महिला ग्राहकांची संख्या लक्षणिय. घरातील समारंभासाठी ऑर्डर देऊन हजार हजार पान मागवणारे अनेक ग्राहक आहेत. अगदी काही लोक तर एकावेळी आठ-दहा पान खाऊनच पुढे जातात, इतकी लज्जत त्यात असते. 

या व्यवसायावर कोरोनाचे संकट आहे. दोन महिने पान मंदिर पूर्णपणे बंद होते. पानाचा व्यवसाय म्हणजे पान खावून लोक पिचकारी मारणार हे ठरलेले आहे. त्यामुळे पानपट्टी सुरु करण्यास लवकर मान्यता मिळाली नाही. ती आता मिळाली आहे, मात्र पान मंदिरची वेगळीच अडचण झाली आहे. तेथे कलकत्ता पानातच विडा बनतो. अगदी साधा पान आणि गोविंद विडा वगळता सर्व विड्यांसाठी मोठ्या आकाराचे, जाडसर कलकत्ता पानच लागते. ते पश्‍चिम बंगालमधून येते. दोन महिने वाहतूक ठप्प आहे. 

त्यामुळे आता पानपट्ट्या सुरु झाल्या असल्या तरी अनिता आणि सरस्वती हतबल आहेत. पान बनवायचे कस? हा प्रश्‍न आहे. नियमित ग्राहकांना पान मंदिर सुरु झाल्याने आनंद झालाय, ते चौकशीही करत आहेत, मात्र त्यांना हवे ते पान बनवता येत नसल्याची नाराजी अनिता यांनी व्यक्त केली. पश्‍चिम बंगालमध्ये सरकार आणि तेथील पान उत्पादक शेतकऱ्यांचा सध्या संवाद सुरु आहे. पानांची वाहतूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साकडे घातले गेले आहे. चौथा लॉकडाऊन संपताच हे सारे सुरळित होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मग पुन्हा विडा रंगेल आणि पान मंदिर पुन्हा बहरेल, अशी आशा आहे. तोवर पान शौकिनांना थोडी प्रतिक्षा करावीच लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: they make 400 types of sweet paan, but lockdown problem