गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय दुर्दैवी : थोरात

आनंद गायकवाड
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

""गड-किल्ले भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा मानस महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अत्यंत दु:खदायक आहे. खरे तर विकासकामे करण्यासाठी सरकारला खूप मोठा वाव आहे; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक महत्त्वाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केले.''

 

संगमनेर : ""महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड-किल्ल्यांच्या साहाय्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड-किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थाने आहेत. राज्य सरकारने ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,'' अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

ते म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांनीच लोकशाहीची संकल्पना रुजवली. सर्वांचे स्फूर्तिस्थान असलेले गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी व चुकीचा आहे. त्यातून त्यांनी काय साधले, हे कळत नाही. गड-किल्ले भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा मानस महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अत्यंत दु:खदायक आहे. खरे तर विकासकामे करण्यासाठी सरकारला खूप मोठा वाव आहे; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक महत्त्वाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केले.''

""राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कंपन्या बंद पडत आहेत. हजारो लोक बेरोजगार होत आहेत. अर्थव्यवस्थेत मोठी मंदी आली आहे. त्यावर उपाययोजना शोधण्याऐवजी सरकार भावनिक मुद्द्यांच्या आधारे राजकारण करू पाहत आहे. फक्त जाहिरातबाजी करून प्रसिद्धी मिळवायची, असे या सरकारचे धोरण आहे. हे सरकार सर्व पातळ्यांवर अत्यंत अपयशी ठरले आहे. शासनाच्या, गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयामुळे तेथे हॉटेल व चंगळवादी संस्कृती निर्माण होईल. त्यातून गड-किल्ल्यांचे पावित्र्य धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करीत आहे,'' असे थोरात म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thorat says The decision to rent a fort is unfortunate