कृषी साहित्य खरेदीतील लिपीकापासून संचालकांची कसून चौकशी

विष्णू मोहिते 
Saturday, 15 August 2020

पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून त्याव्दारे तापमापक यंत्र आणि बॅग खरेदी प्रकरणात अडचणीत आलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह लिपीकापासून ते संचालकांची कसून चौकशी आज करण्यात आली आहे.

सांगली : पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून त्याव्दारे तापमापक यंत्र आणि बॅग खरेदी प्रकरणात अडचणीत आलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह लिपीकापासून ते कंपनीच्या संचालकांची कसून चौकशी आज करण्यात आली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठकांकडे लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती चौकशी पथकाच्या सूत्रांनी दिली. 

कृषी विभागात साहित्य खरेदीसाठी सांगली जिल्हा ग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची पत्नी संचालक आहे. त्यामध्ये आत्मा विभागातील तालुका तंत्र अधिकाऱ्यांच्या घरातील सदस्यांचा यात समाविष्ट आहे. कायद्यानुसार आपल्या कुटूंबातील व्यक्तीला असा लाभ देता येत नाही. तो कायदा बासनात गुंडाळून अधिकारी मास्तोळी यांना कोरोना काळात ताप तपासणीसाठीची यंत्रे खरेदी केली. बाजारातील किमतीपेक्षा अधिक दराने खरेदी झालेली आहे.बुकलेट संच, प्रशिक्षणासाठी बॅगांची खरेदी असे सात लाख रुपयांचे साहित्य या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. 

सुयोग औंधकर यांनी माहिती अधिकार कायद्यातून ही कागदपत्रे मिळवत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून हे पथक सांगलीमध्ये विविध चौकशीसाठी होते. त्यावेळी सांगली जिल्हा ग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीद्वारे केलेल्या खरेदीची चौकशी देखील या पथकाने केली. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह कार्यालयातील सर्व लिपीकांसह या कंपनीत असलेल्या संचालकांची कसून चौकशी केली आहे. त्यात समाविष्ट असणारी चेन लवकर समोर येण्याची शक्‍यता सर्वत्र सुरु आहे. या खरेदीची सर्व चौकशी झाली असून त्याचा अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे. अहवाल तयार झाल्यानंतर सबंधित वरिष्ठांकडे सादर केला जाईल. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A thorough inquiry of the director from the clerk