महापूरग्रस्त 104 गावांतील हजारो लोक गाव सोडण्याच्या तयारीत, कुठे...वाचा ! 

अजित झळके
Tuesday, 18 August 2020

कृष्णा नदीला सन 2005 साली महापूर आला होता. त्यावेळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ 53 फूट पाणी होते. त्याचा मानसिक परिणाम सन 2019 च्या महापुरावेळी झाला. 2005 ला आमच्याकडे पाणी आले नव्हते, यावेळी काय येते?

सांगली ः कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा महाप्रलय 2019 साली पाहिला. सांगली शहराने त्याला प्रचंड फटका बसलाच, मात्र जिल्ह्यातील 104 गावांनी त्याच्या झळा सोसल्या. ती गावे आज पुन्हा एकदा महापुराच्या भितीखाली आहेत. तेथील हजारो लोकांनी गावे सोडण्याची तयारी सुरु केली आहे. पाण्याची पातळी अशीच वाढत राहिली तर गणेशोत्सवाच्या आधी या लोकांना घरे सोडावी लागतील, अशी परिस्थिती आहे. तेथे भितीचे वातावरण आहे, यावेळी वेळ करून चालणार नाही, हे साऱ्यांनी लक्षात घेतले आहे. 

कृष्णा नदीला सन 2005 साली महापूर आला होता. त्यावेळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ 53 फूट पाणी होते. त्याचा मानसिक परिणाम सन 2019 च्या महापुरावेळी झाला. 2005 ला आमच्याकडे पाणी आले नव्हते, यावेळी काय येते? अशा भ्रमात लोक राहिले. पाणी 57 फुटांपेक्षा अधिक आले आणि घरे बुडाली. जनावरे वाहून गेली. शेकडो जनावरे मेली. ब्रह्मनाळ येथे बोट उलटून 17 जणांना जलसमाधी मिळाली. ती चूक यावर्षी करायची नाही, असा निर्णय या दोन्ही नदीकाठांवरीह गावांनी केला आहे. त्यात शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्‍यातील गावांची संख्या मोठी आहे. येथे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी बोटी पोहच केल्या आहेत. संकट वाढू लागले तर लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याची व्यवस्था केली आहे, मात्र त्याआधी जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागेल.

त्यासाठी पाणी अगदी 50 फुटाला येईपर्यंत वाट पाहून चालणार नाही. आता पाण्याची पातळी 40 फुटांवर आहे. ती 45 फुटांपर्यंत जावून थांबेल का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात सलग पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसे झाले तरीही 50 फुटांवर पाणी जाईल, असे नाही, मात्र पाणलोट क्षेत्राच्या खाली पाऊस वाढला तर मात्र संकट अधिक गडद होणार आहे. त्यामुळी ती 104 गावे सावध आहेत. कोणत्याही क्षणी घर सोडून जाण्याची तयारी त्यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of flood victims in 104 villages are preparing to leave the village, where ... Read!