esakal | sangli : द्राक्षबाग कामांत ६० हजारांवर मजूर
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

द्राक्षबाग कामांत ६० हजारांवर मजूर

sakal_logo
By
विष्णू मोहिते-सकाळ वृत्तसेवा

सांगली : बागायत पिकांसाठी काही वर्षांपूर्वी मजुरांची कमतरता होती. जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रातील वाढीमुळे स्थानिक मजुरांकडून कामे करण्यात मोठ्या अडचणी होत्या. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिहारी मजूर कामासाठी येत आहेत. यंदा द्राक्ष फळछाटणीसाठी जिल्ह्यात सुमारे ६० हजारांवर मजूर काम करीत आहेत. द्राक्षांसाठी आणलेल्या मजुरांची खत घालण्यापासून ते पिकांच्या काढणीपर्यंतची कामे करण्याची तयारी असते. या मजुरांची कोठेही नोंदणी होत नाही.

जिल्ह्यात द्राक्षबागांचे क्षेत्र सव्वा लाख एकरावर आहे. सर्वसाधारणपणे फळछाटणीच्या हंगामात एकराला एक मजूर लागतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक मजूर मिळणे अवघड होत असल्यामुळे बिहार राज्यातून प्रतिवर्षी येणाऱ्या

मजुरांची नव्याने भरच पडते आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून मजुरांचा आलेख वाढतोय. यंदा मोजक्याच क्षेत्रावर द्राक्षबागांची नव्याने लागण झाली आहे. जिल्ह्यात १५ दिवसांपासून सुरू झालेल्या छाटणी आणि अन्य कामांसाठी मजूर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये राहतात. पाला काढणी, छाटणी, पिस्ट, खोड-ओलांडा बांधणे, काडी बांधणी, विरळणी, डिपिंग, खते टाकणे, थिनिंग आदी कामे ठरवून घेऊन केली जातात.

पाच तालुक्यांत मागणी

द्राक्षपट्ट्यातील तासगाव, मिरज, पलूस तालुक्यांत द्राक्षाचे क्षेत्र मोठे असल्याने येथे मजुरांची संख्या मोठी आहे. हे मजूर शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये राहतात. या तालुक्यानंतर सध्या कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातही मजुरांना कामानिमित्त मागणी वाढली आहे.

शेतमालकांकडून सुविधा

बिहारचे शेतमजूर शेतावरच शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शेडमध्ये राहतात. शेतमालकांकडून त्यांना शेडबरोबर वीज, पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी गॅस द्यावा लागतो. हे मजूर ४-५ पासून २०-२५ च्या संख्येने एका शेतकऱ्याकडे राहतात. सर्वसाधारण चार-पाच एकरापासून २५ ते ३० एकरांसाठी २५ बिहारी काम करतात. तसेच स्वतः स्वयंपाक करून खातात.

द्राक्षबागांच्या कामासाठी किमान ६० हजारांहून अधिक बिहारी मजूर महत्त्वाची भूमिका पार पाडताहेत. आटपाडीसारख्या भागात एक एकर द्राक्ष बाग असणाऱ्यापर्यंतही बिहारी मजूर पोचला आहे. कुशल कामामुळे त्यांना व्याप्ती वाढीची संधी आहे.

- मारुती चव्हाण, द्राक्षतज्ज्ञ

जिल्ह्यात मोठ्या संख्येने बागांच्या कामांसाठी वर्षातून खरड व फळ छाटणीसाठी मजुरांना मागणी असते. एका व्यक्तीच्या अंतर्गत सर्वसाधारण १५० ते ५०० मजूर काम करतात. प्रामाणिकपणे, चांगले काम करून कुटुंबासाठी केलेली कमाई वर्षभर पुरवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

- संजय मंडल, कामगार संघटक

loading image
go to top