esakal | सांगली जिल्ह्यात हजारांवर धार्मिक स्थळे सोमवारपासून होणार खुली
sakal

बोलून बातमी शोधा

 Thousands of religious places open in Sangli district from Monday

कोरोना महामारीमुळे धार्मिक स्थळांना लागलेले टाळे पाडव्यापासून निघत आहे. या निर्णयाचे बहुसंख्य नागरिकांकडून स्वागत झाले.

सांगली जिल्ह्यात हजारांवर धार्मिक स्थळे सोमवारपासून होणार खुली

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ः कोरोना महामारीमुळे धार्मिक स्थळांना लागलेले टाळे पाडव्यापासून निघत आहे. या निर्णयाचे बहुसंख्य नागरिकांकडून स्वागत झाले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या सुमारे हजारांवर मंदिर तसेच धार्मिक स्थळे अधिकृतपणे खुली होत आहे. विशेषतः सांगलीतील गणपती मंदिर आणि मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यांत सर्वांना प्रवेश खुला होणार असल्याने सुटीसाठी आलेल्या सांगलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

सुमारे साडेसातशेंवर गावांमधील मंदिर, मशिदी तसेच अन्य धार्मिक स्थळे शासन निर्णयामुळे बंद झाली. होळीपासून बहुतेक सणांवेळीही मंदिरे बंद राहिली. ग्रामीण भागातही प्रारंभीच्या काळात कडेकोटपणे बंदी पाळण्यात आली. नंतर हळूहळू ग्रामस्थांनी त्यात ढिलाई दिली. शहरी भागात मात्र बंदीचे काटेकोर पालन झाले. सांगलीत संकष्टीलाही सलगपणे गणपती मंदिर बंद राहिले. इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. गणेशोत्सवकाळात शाही मिरवणूकही झाली नाही. तासगाव, कडेगाव येथील उत्सव बंद राहिले. आता पाडव्यालाच मंदिरे उघडण्यात आल्याने दिवाळीच्या नवपर्वाची सुरवात चांगली झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेखही आता घटता असल्याने धार्मिक स्थळे सुरू रहावीत यासाठी आग्रह वाढत होता. अखेर शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. 

औदुंबरला नियमांचे काटेकोर पालन 
अंकलखोप : श्री क्षेत्र औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी सोमवारपासून (ता. 16) खुले करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भाविकांना प्रवेश दिला जाईल. मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवले जाणार आहे. हात धुण्याचीही व्यवस्था केली आहे. एकावेळी फक्त दहा भाविकांना मंदिरात सोडले जाईल. तेही दोन मीटरचे अंतर ठेवून. मंदिर परिसरात कोरोनापासून घ्यावयाची काळजी माहिती देणारे फलक ही विविध ठिकाणी लावले जाणार आहेत, अशी माहिती दत्त देवस्थान मंडळाचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमोल पाटील व सचिव धनंजय सूर्यवंशी यांनी दिली. 

नियमांचे सर्व पालन करण्यात येईल

सोमवारपासून गणपती मंदिर उघडण्यात येणार असून, यावेळी कोरोनाच्या नियमांचे सर्व पालन करण्यात येईल. तसेच गेले आठ महिने मंदिरात विधिवत पूजा केली जात होती. 
- जयदीप अभ्यंकर, व्यवस्थापक, सांगली गणपती पंचायतन, सांगली 

दोन ते तीन दिवसांत मंदिर खुले

शासनाने राज्यातील सर्व देवस्थान खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्वागतार्ह आहे. आठ महिन्यांनंतर भाविकांना गुड्डापूरच्या दानम्मा देवीचे दर्शन घेता येणार असून, शासनाने देवस्थान खुली करतानाच भाविकांच्या सुरक्षेसाठी जी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार दोन ते तीन दिवसांत मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. 
- प्रकाश गणी, देवस्थान समिती अध्यक्ष, गुड्डापूर 

आठवड्याभरात  भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर बंद आहेत. यामुळे शासनापुढेही भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न होता. मात्र, शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर केली असून, ती पाहून आठवड्याभरात भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. 
- शार्दुलराजे डफळे, अध्यक्ष, श्री यल्लमा देवी ट्रस्ट, जत 

संपादन : युवराज यादव