लॉकडाउनमुळे सांगलीत हजारो वाहन परवाने प्रलंबित

शैलेश पेटकर
Friday, 31 July 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठवड्यापासून लॉकडाउन करण्यात आले असून या काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्णतः ठप्प होते.

सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठवड्यापासून लॉकडाउन करण्यात आले असून या काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्णतः ठप्प होते. या कालवधीतील सुमारे दीड हजारावर कच्चे व पक्के वाहन परवाने प्रलंबित आहेत.

ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली अपॉईंटमेंट रद्द करण्यात आली आहे. तसेच सुमारे सातशेवर नव्या वाहनांची नोंदही ठप्प आहे. याशिवाय योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, अनुज्ञप्ती नुतनीकरणाचेही कामही बंद आहे. या कालावधीतील महसुलावरही आरटीओ विभागास पाणी सोडावे लागले आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वी तीन महिन्यांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. या कालावधित सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होते. मात्र, आरटीओ विभाग बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने कामकाज पूर्णतः ठप्प होते. या तीन महिन्याच्या काळात सुमारे तीस कोटींचा महसूल बुडाला. तसेच हजारो वाहन परवाने प्रलंबित राहिले. त्यानंतर शिथीलता मिळाल्यानंतर कामकाज सुरू झाले. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून परवाने वितरण करण्यात आले. 

दरम्यानच्या काळात शहरी भागात रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होवू लागल्याने 23 जुलैपासून पुन्हा लॉकडाउन करण्यात आले. या काळतही आरटीओ विभागाचे कामकाज बंद होते. या सात दिवसांत सुमारेस दीड हजारवर कच्चे व पक्का वाहन परवाना प्रलंबित आहे. ऑनलाइन पद्धतीने याची नोंदणी केली जात असून ती नोंदणी रद्द करण्यात आली आहे. शिथीलता दिल्यानंतर त्यांना पुन्हा तारखा दिल्या जाणार आहे. तसेच नव्या सातशेवर वाहनांची नोंदणीही प्रलंबित आहे. 

मोबाईलवर मेसेज... 
परवानासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन अपॉईंटमेंट रद्द करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा रि-शेड्यूल्ड करण्यात आल्या असून याबाबतचे मोबाईल मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही गोंधळ निर्माण झालेला नाही. 

लॉकडाउन कळात कार्यालयीन कामकाज बंद ठेवले होत. वाहन परवाना देण्याचे कामही बंद होती. या काळात घेण्यात आलेल्या अपॉईंटमेंट पुन्हा नव्याने देण्यात आलेल्या आहेत. तसेच लॉकडाउननंतर कार्यालयात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या परवानासाठीही मुदत देण्यात आली आहे. 
- विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of vehicle licenses pending in Sangli due to lockdown