
येत्या दोन महिन्यांत ही वाहने मूळ मालकांनी मालकी हक्काचे हितसंबंध, वारसा, तारण, विमा हक्क याबाबतचे मूळ दस्ताऐवज दाखवून घेवून जावी. त्यानंतर सर्व वहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी नोटीसीद्वारे जाहीर केले आहे.
सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी अशा 348 वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत ही वाहने मूळ मालकांनी मालकी हक्काचे हितसंबंध, वारसा, तारण, विमा हक्क याबाबतचे मूळ दस्ताऐवज दाखवून घेवून जावी. त्यानंतर सर्व वहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी नोटीसीद्वारे जाहीर केले आहे.
विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेल्या दुचाकीसह वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात लावून ठेवली आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेकांनी वाहने सोडवून घेण्याची तसदीच दाखविलेली नाही. अपघातातील वाहने पुन्हा घरी नको, ती पोलिस ठाण्यातच राहु दे, असा मानसिकतेखाली अनेक अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्याच्या दराता वर्षानुवर्षे सडत पडली आहेत.
उन्हाळा, पावसाळ्यात ती उघड्यावरच पडल्याने सडून, गंजून गेली आहेत. जिल्ह्यातील सांगली शहर, ग्रामीण, विश्रामबाग, संजयनगर, मिरज शहर, ग्रामीण, कुपवाड, महात्मा गांधी चौकी, इस्लामपूर, आष्टा, शिराळा, कुरळप, कासेगाव, कोकरूड, तासगाव, कुंडल, पलुस, भिलवडी, विटा, आटपाडी, कडेगाव, चिंचण वांगी, जत, कवठेमहांकाळ, उमदी, वाहतूक शाखा, एलसीबी अशा 28 ठिकाणी वाहनांचा ढिग साचल्याने पोलिस ठाण्यांचा श्वास कोंडत आहे.
पावसाचे पाणी या गाडांमध्ये साचून राहिल्याने डेंगूसह विविध साथीच्या आजारांचा सामनाही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करावा लागतो आहे. चांगली वाहने अनेकवर्ष पडून रहिल्याने निकामी झाली आहेत. त्यांना वापरात आणता येणार नाही, अशी बिकट अवस्थाही अनेक वाहनांची झाली आहे. सुमारे 303 दुचाकी, 13 तीनचाकी, 18 चारचाकी आणि 2 सहाचाकी अशा सुमारे 348 वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलिस अधीक्षक गेडाम यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
""जाहीनाम्यात प्रसिद्ध केलेल्या वाहनांबाबत आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देवून आपले वाहन घेवून जावे. साठ दिवसांनी संबंधित वाहनांवर आपला हक्क सांगता येणार नाही. या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.''
- दीक्षित गेडाम,
पोलिस अधीक्षक, सांगली