तिळ्यांना जन्म देताच तिचा झाला मृत्यू ; 4 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस :Belguam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Young woman dies due to negligence of doctors in Yavatmal

तिळ्यांना जन्म देताच तिचा झाला मृत्यू ; 4 डॉक्टरांना नोटीस

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव: तिळ्यांना जन्म दिल्यानंतर मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता.५) जिल्हा रुग्णालयात घडली होती. जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे. असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभाराबद्दल सकाळने देखील सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या बिम्सचे संचालक डॉ. आर. जी. विवेकी यांनी प्रसूतीविभागातील चौघां डॉक्टराना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे बिम्समधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पवित्रा मडिवाळ (रा. केंगांनुर ता. बैलहोंगल) असे मयत बाळंतिणीचे नाव आहे. पवित्रा ही गर्भवती होती. त्यामुळे तिला गुरुवार (ता.४) प्रसूतिवेदना सुरू झाल्याने कुटुंबियांनी तिला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरानी तिची तपासणी केली. त्यावेळी रात्री पवित्राची प्रसूती होण्याची शक्यता असल्याचे सांगून तिला वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी तिला प्रचंड वेदना सुरू झाल्या. कुटुंबानी त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याकडे विनवणी करून डॉक्टरांना बोलावण्याची मागणी केली. पण, तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते.

कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू करताच शुक्रवार (ता.५) त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, तिची प्रकृती खालावत जाऊन तिने तिळ्याना जन्म दिला. त्यानंतर काही वेळातच तीचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाने जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे आपल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आक्रोश केला होता. यापूर्वी देखील प्रसूतिगृहासह वेगवेगळ्या वार्डमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे. त्यामुळे या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संचालक डॉ.विवेकी यांनी बिम्समधील प्रसूती विभागात सेवा बजावणाऱ्या चौघांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याने ताततीने डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी काहीजण दोषी आढळून आल्याने चौघांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर नोटीसीला आज उत्तर देण्याची सूचना केली आहे. पण, कोणाकडूनही अद्याप उत्तर आलेले नाही.

डॉ. आर. जी. विवेकी, संचालक बीम्स.

loading image
go to top