esakal | मनपा क्षेत्रात तीन दिवस "लॉक डाऊन' चा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

traders meeting.jpg

सांगली-"कोरोना' विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील सर्व व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक यांनी रविवारी "जनता कर्फ्यू' बरोबर सोमवार व मंगळवारीही कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. 

मनपा क्षेत्रात तीन दिवस "लॉक डाऊन' चा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-"कोरोना' विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील सर्व व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक यांनी रविवारी "जनता कर्फ्यू' बरोबर सोमवार व मंगळवारीही कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. 


मार्केट यार्डातील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आज सायंकाळी सांगलीतील सर्व व्यापारी, व्यवसायिक आणि उद्योजकांच्या संघटनांची संयुक्त बैठक झाली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महापालिका आयुक्त नितिन कापडणीस, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, माजी महापौर सुरेश पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, "कॅट' चे अतुल शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अतिरिक्त जिल्हाधिकारी कदम म्हणाले, ""कोरोना विषाणूचा स्वतःसह कुटुंब आणि समाजाने संघटीतपणे मुकाबला करणे गरजेचे आहे. शासनाचे आदेश, कारवाईचा इशारा याची प्रतिक्षा न करता आपणही खबरदारी घ्या. गर्दीत जाणे टाळा. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाचे आदेश पाळा.'' 
पुरवठा अधिकारी बारवे म्हणाल्या, ""दुध, भाजीपाला, किराणा माल यासह जीवनाश्‍यक गोष्टींची कमतरता भासणार नाही याची काळजी घेऊन बंद पाळा. उपासमार होईल असा कोणताही प्रकार नको. भविष्यात शटरडाऊनची गरज पडली तर अडचण येऊ नये यासाठी दोन-तीन दिवस बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.'' 

समिर शहा म्हणाले, ""कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी व्यापारी सदैव प्रशासन व जनतेसोबत राहतील. आम्ही व्यापार बंद ठेऊन सहकार्य करू. मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे डी-मार्ट, रिलायन्स मार्केट अशा आस्थापना बंद करण्याचे आयुक्तांनी आदेश द्यावेत.'' 
सराफ असोसिएशनचे किशोर पंडीत म्हणाले, ""एकाच वेळी बंद न ठेवता टप्याटप्याने निर्णय घेऊ. गुढी-पाडव्यानंतर आलटुन-पालटुन व्यापार बंद ठेवायचा प्रयत्न करा. पहिल्या टप्यात मात्र सलग तीन दिवस बंद पाळूया.'' 

आयुक्त नितिन कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनीही मार्गदर्शन केले. माजी महापौर सुरेश पाटील, विराज कोकणे, शैलेश पवार, अतुल शहा आदींनी सूचना मांडल्या. अरूण दांडेकर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे सचिन पाटील, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी, कुपवाड एमआयडीचे अनिल चिमड, भाजीपाला संघटनेचे शंभोराज काटकर आदींसह विविध व्यापारी संघटना, हॉटेल चालक संघटना, किरणा-भूसार संघटनांसह विविध व्यापारी उपस्थित होते. 

गुरूवारी पुढील धोरण- 
रविवारी जनता कर्फ्यूनंतर सोमवार व मंगळवारी तिन्ही शहरात कडकडीत बंद पाळला जाईल. त्यानंतर पुढील धोरण ठरवण्यासाठी गुरूवारी बैठक घेतली जाणार आहे. आलटून-पालटून पेठा बंद ठेवण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. 
 

सलून-ब्युटी पार्लर 31 पर्यंत बंद- 
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सांगली जिल्हा शाखेने 21 ते 31 मार्चअखेर जिल्ह्यातील सलून दुकाने आणि ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य संघटक शशिकांत गायकवाड, विभागीय उपाध्यक्ष अशोक सपकाळ, जिल्हाध्यक्ष अनिल काशिद आदी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

पेट्रोलपंप सुरूच- 
पेट्रोल-डिझेल अत्यावश्‍यक सेवा आहे. त्यामुळे रविवारी (ता.22) कोणताही पंप बंद राहणार नाही. अफवांवर विश्‍वास ठेवू नका. आवश्‍यकता असेल तरच पंपावर या असे आवाहन सांगली जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनने केले आहे.