मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बेळगाव जिल्ह्यात बालकासह तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

  • मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तीन जण ठार. 
  • कागवाड येथे बुधवारी (ता. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास अपघात.
  • सचिन कलगोंडा पाटील (वय 40), संजीव रावसाहेब पाटील-जुगळे (वय 35) व हुसेन गुळापन्नावर (वय 5) अशी मृतांची नावे. 

कागवाड - मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तीन जण ठार झाल्याची घटना कागवाड येथे बुधवारी (ता. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सचिन कलगोंडा पाटील (वय 40), संजीव रावसाहेब पाटील-जुगळे (वय 35) व हुसेन गुळापन्नावर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण कागवाड येथील आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी कागवाड येथील पाटील गल्लीतील दुर्गामाता मूर्तीची विसर्जन मिरवणूक कृष्णा नदीच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी कागवाडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. मिरवणुकीत ट्रॅक्टर कसा घुसला याची माहिती पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत घेण्यात येत होती. कागवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून पोलिस अधिक तपास करीत होते.

रात्री अंधारात हा अपघात झाल्याने घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. मिरवणुकीत घुसलेला ट्रॅक्टर गणेशवाडी येथील असून प्राथमिक अंदाजानुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three dead in an accident in Kagwad in Belgaum District