दोन सोसायट्यांचे तीन संचालक अपात्र; कुठे ते वाचा

गोरख चव्हाण
Friday, 17 July 2020

खरशिंग ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील दोन सोसायट्यांच्या तीन संचालकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

कवठेमहांकाळ : खरशिंग ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील दोन सोसायट्यांच्या तीन संचालकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सहायक निबंधक उर्मिला राजमाने यांनी ही कारवाई केली. 

खरशिंग विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत एकूण 13 संचालक असून यापूर्वी विद्यमान सरपंच सुहास शिवाजी पाटील, भानुदास रघूनाथ पाटील, लक्ष्मी उध्दव पाटील, सरिता संजय पाटील, शिवाजी रघूनाथ मोहिते व विष्णू सखाराम मलमे या सहाजणांवर थकबाकीदार तसेच संस्थेच्या बैठकांना गैरहजर असल्याचा ठपका ठेवत अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर पोपट नायकू पाटील, तानाजी भीमराव पाटील या दोघांची संचालक म्हणून नियुक्‍ती झाली होती. संस्थेचे संचालक केशव दत्तू कोरे हे नानासाहेब सगरे को-ऑप क्रेडिट सोसायटीचे थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र ठरवले. तसेच दुसरे संचालक बबन निवृत्ती पाटील हे खरशिंग विकास सेवा संस्थेसह नानासाहेब सगरे को-ऑप क्रेडिट सोसायटी, अजितराव घोरपडे अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी या तीन संस्थांचे थकबाकीदार असल्याने त्यांचेही पद रद्द केले गेले. आता पुन्हा दोन संचालकांना अपात्र ठरवण्यात आल्याने आल्याने सात संचालकांवर संस्थेचा कारभार सुरु आहे. 

त्याचप्रमाणे श्री दंडनाथ सामुदायिक सहकारी शेती सोसायटीत 11 संचालक असून यापूर्वी जगन्नाथ मारुती पाटील, भगवान दत्तू पाटील, लालासाहेब भीमराव पाटील व राजाराम चंदर मोहिते यांनी शासनाच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवले होते. तर शालन आनंदा मलमे व जगन्नाथ तुकाराम मलमे या दोघांनी राजीनामा दिल्याने संस्थेत 5 संचालक राहिले होते.

त्यापैकी उत्तम शिवाजी क्षीरसागर यांना तीन अपत्ये असल्याने सहकारी संस्थेत पदाधिकारी राहता येत नसल्याने सदस्यत्व रद्दची कारवाई करण्यात आल्याचे सहायक निबंधक उर्मिला राजमाने यांनी निकालात म्हटले आहे. सुरेश जगन्नाथ पाटील यांनी याप्रकरणी हरकत घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three directors of two societies in Kharshing are disqualified