esakal | तीन खांडसरी कारखान्यांनी केली तीनशे हेक्‍टरवरील ऊसाची तोडणी
sakal

बोलून बातमी शोधा

Three Khandsari mills harvested sugarcane on 300 hectares in Kadegao- Sangali

अवकाळी पावसाने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबणीवर पडत असतानाच कडेगाव तालुक्‍यात तीन खांडसरी कारखान्यांनी ऊसतोडीचा धडाका लावला आहे.

तीन खांडसरी कारखान्यांनी केली तीनशे हेक्‍टरवरील ऊसाची तोडणी

sakal_logo
By
संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली ) : अवकाळी पावसाने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबणीवर पडत असतानाच तालुक्‍यात तीन खांडसरी कारखान्यांनी ऊसतोडीचा धडाका लावला आहे. आतापर्यंत तालुक्‍यातील सुमारे तीनशे हेक्‍टरवरील ऊसाची तोडणी केली आहे.

तालुक्‍यात ताकारी व टेंभू सिंचन योजनांच्या माध्यमातून हरित क्रांती झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यात सध्या ऊसाचे सुमारे वीस ते बावीस हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. 
येथील शेतकऱ्यांचा ऊस डॉ. पतंगराव कदम सोनहिरा, क्रांती, सह्याद्री, उदगिरी, कृष्णा, केन ऍग्रो, गोपूज, जयवंत आदी साखर कारखान्यांना गाळपासाठी जातो. तर राज्यात ऑक्‍टोबरमध्ये साखर आयुक्तांच्या आदेशाने गाळप हंगामास सुरुवात होते.परंतु यावर्षी कोरोनाचे संकट व अवकाळी पावसामुळे साखर कारखान्याचे गळीत हंगाम लांबणीवर पडले आहेत.

साखर आयुक्तांचे खांडसरी कारखान्यांवर नियंत्रण नसल्याने सप्टेंबर मध्येच या खांडसरी कारखान्यानी आपले गळीत हंगाम सुरु केले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांच्या एफआरपीत वाढ होणार आहे. चालुवर्षी डॉ पतंगराव कदम सोनहीरा, राजारामबापू, क्रांती, हुतात्मा आदी कारखान्यांची एफआरपी नुसार 2900 ते 3000 हजारहुन अधिक दर मिळण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे ऊस उत्पादकांना यावर्षी चांगले दिवस येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.परंतु खांडसरी कारखान्यांचा दर साखर कारखान्यापेक्षा कमी असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
.

प्रतिटन कमी ऊस दर

तालुक्‍यात सध्या तीन खांडसरी कारखान्याकडून ऊसतोडणी सुरु आहे. परंतु हे खांडसरी कारखाने प्रतिटन कमी ऊस दर देत आहेत. तेव्हा खांडसरी कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत जो प्रतिटन ऊस दर ठरेल तो दर द्यावा अन्यथा तालुक्‍यात ऊसाची टिपरी तोडू देणार नाही. 

- युनूस पटेल, अध्यक्ष, कडेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना.

संपादन : युवराज यादव