सांगली, मिरजेत तीन कोविड केअर सेंटर सुरु होणार

बलराज पवार 
Wednesday, 9 September 2020

सांगली : महापालिकेच्या पुढाकाराने आज सांगली आणि मिरजेत तीन कोविड केअर सेंटर सुरु होणार आहेत.

सांगली : महापालिकेच्या पुढाकाराने आज सांगली आणि मिरजेत तीन कोविड केअर सेंटर सुरु होणार आहेत. सांगलीत गणेशनगरमध्ये साद वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने तर मिरजेत हयात फौंडेशनच्या वतीने सेंटर सुरु होणार आहेत. मिरजेतील हॉटेल सुखनिवास येथील कोविड केअर सेंटरचे आज उद्‌घाटन झाले. या नवीन कोविड सेंटरमुळे ऑक्‍सिजनसाठी धावाधाव करणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. 

सांगलीत गणेशनगरमध्ये स्विमिंग टॅंकजवळ साद वेल्फेअर फाऊंडेशनने सुरु केलेल्या सेंटरमध्ये 30 ऑक्‍सिजन बेडची सुविधा असणारे बेड असून यात पाच आयसीयू बेडचा सामावेश आहे. हे कोविड हेल्थ सेंटर गुरुवारी (ता. 10) सुरु होणार आहे. 

मिरजेत हयात फौंडेशन संचलित 40 बेडचे अरफा हेल्थ केअर कोविड हॉस्पिटल शेतकरी भवन येथे होणार आहे. हे सेंटर उभारण्याचे काम सुरु असून येत्या ता. 14 पासून ते सुरु होईल. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज या सेंटरला भेट देऊन त्याच्या उभारणीची पाहणी केली आणि काही सूचना केल्या. याठिकाणी ईसीजी मॉनिटरिंग, ऑक्‍सिजन सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्‍टरही येथे असणार आहेत. 

महापालिकेच्या पुढाकाराने मिरज शहरातील डॉ. सुनील कुलकर्णी आणि डॉ. अमित दोरकर यांनी हॉटेल सुखनिवास येथे सुरु केलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्‌घाटन आज झाले. या सेंटरमध्ये पहिल्या टप्यात ऑक्‍सिजनची सुविधा असणारे 50 बेड तयार करण्यात आले आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Kovid Care Centers will be started at Sangli, Miraj