ऊस तोडणारी तीन माणसांची टोळी

विनोद शिंदे
बुधवार, 15 जानेवारी 2020

म्हैसाळ (ता. मिरज) येथे मात्र तीनच माणसांची ऊस तोडणारी टोळी गेल्या महिनाभरापासून आलेली आहे. यात दोन पुरुष, एक महिला आणि त्यांचे वाहन असा लावाजमा आहे. ही टोळी म्हैसाळ परिसरात कुतूहलाचा विषय ठरली आहे. 

म्हैसाळ : उसाची टोळी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते दहा-पंधरा जणांची टोळी. उसाच्या फडातील चालणारी त्यांची लगबग. पोरा टोरांचा कल्ला आणि बरेच काही. म्हैसाळ (ता. मिरज) येथे मात्र तीनच माणसांची ऊस तोडणारी टोळी गेल्या महिनाभरापासून आलेली आहे. यात दोन पुरुष, एक महिला आणि त्यांचे वाहन असा लावाजमा आहे. ही टोळी म्हैसाळ परिसरात कुतूहलाचा विषय ठरली आहे. 

उमरी (ता. केज, जि. बीड) या गावातील राजाभाऊ मुळे आणि त्यांचे बंधू संतोष, भावजय द्वारका असे हे त्रिकूट आरगेच्या मोहनराव शिंदे साखर कारखान्यांच्या माध्यमातून म्हैसाळ परिसरात ऊस तोडणी करण्यासाठी आलेले आहे. उसाची तोडणी करणे, वाहनात ऊस भरणे आणि कारखान्यात गाळपास पोहोचविणे अशी कसरत ह्या तिघांतच करण्यात येत असते. पहाटे सहा वाजता मुळे कुटुंबीय उसाच्या फडात दाखल होऊन तोडणीला सुरवात करतात. सौ. द्वारका या उसाच्या मोळ्या बांधण्याचे काम करतात. चार ते साडे चार वाजेपर्यंत सहा ते सात टनांच्या उसाची भरती झाल्यावर त्यांच्या स्वत: च्या वाहनात ऊस भरण्यास सुरवात करून सहा वाजता कामाची सुटी करतात. भरलेले वाहन घेऊन संतोष मुळे लागोलाग कारखान्याकडे रवाना होतात. पहाटे चार वाजेपर्यंत वाहन रिकामे करून ते परत उसाच्या फडात मुक्कामाच्या ठिकाणी परत येतात. असा हा मुळे कुटुंबीयांचा खडतर दिनक्रम आहे. 

मुळे कुटुंबीयांचा गेल्या पंधरा वर्षांपासूनचा ऊस तोडणीचा व्यवसाय आहे. या पंधरा वर्षांत बरेच चांगले वाईट अनुभव आल्याचे राजाभाऊ मुळे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही घरातीलच माणसे ऊस तोडणी करत आहोत. घरची थोडी शेती आहे. त्यात कापूस आणि सोयाबीनची पिकं घेतली जातात. तोडणीचा हंगाम आणि कापूस काढणीचा हंगाम जवळपास एकाच वेळी येत असल्याने घरातील अन्य सदस्यांना गावाकडेच थांबावे लागते. अलीकडच्या काळात पूर्वी सारखी शब्दाला किंमत राहिलेली नाही. कारखान्याकडून उचल घ्यायची आणि कामगारांना वाटायची असा वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आता जोखमीची झालेली आहे. यामुळे नसत्या कटकटीला सामोरे जाण्यापेक्षा आपण कुटुंबातील सदस्यांचीच टोळी केली आहे. थोडासा त्रास सोसावा लागतो, मात्र समाधानी असल्याचे श्री. मुळे म्हणाले. 

समन्वयामुळे कामाचा ताण नाही

गेल्या हंगामात आम्ही साडे तीन लाखांहून अधिक व्यवसाय केला. नियोजन केल्याने चांगला फायदा झाला. कुटुंबातील सदस्य असल्याने चांगल्या समन्वयामुळे कामाचा ताण वाटत नाही. आम्हां बंधूंना माझी पत्नी द्वारका हिची चांगली साथ मिळत आहे. 
- संतोष मुळे, ऊस तोडणी मजूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three man team of sugarcane labour