
सांगली : महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून पाचजण इच्छूक आहेत. शिवाय पक्षात अनेकजणांना पद मिळण्याची अपेक्षा आहे. पक्षश्रेष्ठींनी सर्वांना संधी देण्याचे गाजर वारंवार दाखवले आहे. मात्र आता अडीच वर्षात कितीजणांना संधी मिळणार? यामुळे अनेकजण नाराज होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अडीच वर्षात तिघांना महापौरपदाची संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आता पहिली संधी कुणाला? याकडे लक्ष लागले आहे.
महापौरपदाची निवडणूक येत्या 23 फेब्रूवारीला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 18 मार्चपर्यंत आहे. त्यामुळे आता तीन दिवस बाकी असल्याने इच्छूकांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इच्छूकांची भेट घेतली.
माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी स्थायी सभापती अजिंक्य पाटील, निरंजन आवटी, माजी गटनेते युवराज बावडेकर, ऍड. स्वाती शिंदे हे इच्छूक सदस्य एकत्रित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटले. त्यांनी आपल्यापैकी कुणालाही महापौरपदाची संधी द्यावी असे त्यांना सांगितले. मात्र प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी तिघांना संधी देणार आहे, तुम्हीच पहिला, दुसरा, तिसरा क्रम ठरवून नावे सांगा अशी गुगली टाकली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी तिघांना संधी देणार असल्याचे सांगितल्याने दोनजणांचे पत्ते कट होणार आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळणार यासाठी आता फिल्डींग लावली जात आहे. तीन जणांना संधी मिळणार असल्याने प्रत्येकी दहा महिने संधी मिळेल. त्याचबरोबर तीन उपमहापौरही होतील.
शिवाय आणखी दोघांना स्थायी समिती सभापतीपद मिळणार आहे. तसेच गटनेतेपदीही एकाला संधी देण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. त्यामुळे इच्छूकांना पदे देऊन नाराजी थोपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिकेची सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा हा द्राविडी प्राणायाम सुरु आहे. पण, यामुळे नाराजी थांबवण्यात यश येणार का? हा प्रश्न आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.