सांगली जिल्ह्यात पावसामुळे तिघेजण गेले वाहून

Three persons were swept away due to rains in Sangli district
Three persons were swept away due to rains in Sangli district

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडाली. ओढे-नाल्यातून आणखी तिघे जण वाहून गेले आहेत. गेल्या पाच दिवसांत पाण्यातून वाहून जाणाऱ्यांची संख्या सहा झाली आहे. आटपाडी तालुक्‍यात करगणी येथे 22 वर्षांचा तरुण, जत तालुक्‍यातील करजगी पुलावरून ट्रॅक्‍टर चालक, तर मिरज तालुक्‍यातील मल्लेवाडी ओढ्यातून एक महिला वाहून गेली. कोयना, चांदोली धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे दोन्ही नद्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


22 वर्षांचा तरुण करगणीमधून गेला वाहून 

आटपाडी : तालुक्‍यातील मुख्य माणगंगा नदी, शुक आणि बेलवण ओढ्यांनी आज उग्र रूप धारण केले. यामध्ये करगणी येथील शुभम संजय जाधव (वय 22) वर्षीय तरुण वाहून गेला. वीस वर पूल पाण्याखाली गेले तर अनेक गावचा पूर्ण संपर्क तुटला. अनेक ठिकाणी ओढ्या पात्रात पाणी न मावल्यामुळे ओढ्याच्या पात्रालगतची शेती पाण्यासह वाहून गेली. 
करगणी येथील रामनगरमधील शुभम जाधव हा सकाळी दहा वाजता मासे धरण्यासाठी ओढ्यावर गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. ग्रामस्थ आणि पोलिसांनी पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत ओढ्याच्या काठाने शोधाशोध केली. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. बहुतांश ओढ्यांनी उग्ररूप धारण केल्यामुळे ओढ्याच्या काठाने असलेल्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्या आहेत. ओढ्यावर असलेल्या अनेक बंधाऱ्यात पाणी क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे या ठिकाणी ओढ्याचे पात्रच बदलून गेले आहेत. शेकडो माती नाला बांध, पाझर तलाव फुटले. 

आटपाडीत 1000 मीमी 
आटपाडी तालुक्‍याने 1000 मिलिमीटर पावसाचा टप्पा गाठला. बुधवारी आटपाडी तालुक्‍यातील खरसुंडी मंडलमध्ये 104, आटपाडी 95 आणि दिघंची मंडलमध्ये 91 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत खरसुंडी मंडलमध्ये 1004, तर आटपाडी मंडलमध्ये 989 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्‍याने विक्रमी एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा गाठला आहे. 

भिवर्गी-करजगी पुलावरून ट्रॅक्‍टरसह एकजण गेला वाहून; चालक बचावला

जत : भोर नदीला आलेल्या पुराने भिवर्गी-करजगी पुलावरून दूध भरून निघालेला ट्रॅक्‍टर पाण्यात वाहून गेला. यामध्ये चालकासह दोघे पुराच्या पाण्यात बुडाले. ट्रॅक्‍टर चालकाने पोहत नदीचा काठ जवळ केला. मात्र, पिंटू भिमू धायगुडे (वय 32, रा. सनमडी, ता. जत) हा तरुण प्रवाहात वाहून गेला. गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

भोर नदीला पूर आल्याने नदीवरील सर्वच पुलांवरून पाणी वाहत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरात कोणतीही दुर्घटना घडू नये, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी प्रत्येक पुलाजवळ होमगार्ड तैनात करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित होमगार्डने ट्रॅक्‍टर चालकाला पाण्यात गाडी घालू नको, अशी सूचना केली होती. मात्र चालकाने ऐकले नाही. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलावरून खाली नदीत कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी घेतली व पोहत काठावर पोहोचला. ट्रॉलीमध्ये असलेल्या पिंटू धायगुडे हा तरुण प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांनी उमदी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी, गावचे सरपंच व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाचा शोध सुरू केला आहे. 

दरम्यान, बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संख ते गुड्डापूर रोडवरून दुचाकीवरून निघालेला चंद्रशेखर शिवाजी मुठेकर हा तरुण पाण्यात वाहून गेला. पोहायला येत असल्याने तो पाण्याच्या प्रवाहातून अंकलगी बंधाऱ्यातून सुखरूप बाहेर पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली असून, दुचाकी मात्र वाहून गेली. 

मल्लेवाडी ओढ्यातून महिला गेली वाहून 
सांगली ः मिरज-सलगरे राज्यमार्गावरील मल्लेवाडी ओढ्याला आलेल्या पुरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जयश्री संजय दुरुरे (वय 40, मल्लेवाडी, दर्गा परिसर) ही महिला वाहून गेली. तिचा पती संजय धनपाल दरुरे (वय 48) व धोंडिराम लालासाहेब शिंदे (वय 62) या दोघांना वाचवण्यात स्थानिक तरुणांना यश आले. 

याबाबतची अधिक माहिती अशी, राज्यमार्गावरील हा ओढा कालच्या पावसाने दुथडी भरून वाहत आहे. काल रात्री दरुरे दांपत्य मालगावला नातलगाकडे दुचाकीने गेले होते. रात्री ओढ्याला पाणी आल्याने त्यांनी ओढ्याच्या अलीकडेच एकाकडे मुक्काम केला. आज सकाळी ते पुन्हा गावात येण्यासाठी ओढ्याच्या काठावर येऊन बसले होते. तास दोन तास त्यांनी पाणी कमी होईल या आशेने वाट पाहिली. शेवटी पाणी कमी होत नाही म्हणून ते आणखी त्यांच्याप्रमाणेच पलीकडे जायचे म्हणून वाट पाहणाऱ्या शिंदे यांच्यासोबत पाण्यातून जायचा निर्णय घेतला. पुलावर सुमारे तीन साडेतीन फूट पाणी होते. पाण्याला मोठा वेग असल्याने तिघेही वाहून जाऊ लागले.

हा प्रकार ओढ्याच्या पलीकडे असलेल्या नीलेश जकाते, लखन करपे, दीपक करपे, सनी जकाते, सुरेश कांबळे, रसिक जकाते यांनी पाहिला. त्यांनी पाण्यात धाव घेत तिघांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. धोंडिराम, संजय यांना वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र जयश्री पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह गावातील यल्लमादेवी मंदिराजवळील झुडपात सापडला. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com