वेजेगाव येथील तीन हजार जनावरांचा जीव टांगणीला

सचिन निकम
Friday, 20 November 2020

वेजेगाव (ता. खानापूर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्‍टर, कर्मचाऱ्याविना ओस पडला असल्याने परिसरातील सुमारे तीन हजार जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. 

लेंगरे : वेजेगाव (ता. खानापूर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्‍टर, कर्मचाऱ्याविना ओस पडला असल्याने परिसरातील सुमारे तीन हजार जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. 

लाखो रुपये खर्च करून शासनाने सर्वसोयींनी युक्त दवाखाना बांधला, परंतु दवाखाना असूनही जनावरांची गैरसोय सुरूच आहे. कोरोनाप्रमाणे जनावरांत संसर्गजन्य रोगराई पसरली आहे. यात लॅम्पी या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. 

अगोदरच कोरोना, अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्‍टरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची झळ सोसावी लागते. परिसरातील वेजेगाव, वलखड, भिकवडी बुद्रुक, साळशिंगे, भेंडवडे गावातील जनावरांच्या सोयीसाठी वेजेगाव येथे "अ' वर्ग दर्जाचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. दवाखान्याच्या परिसरातील गावात शेळ्या-मेंढ्या जनावरांची सुमारे तीन हजारांवर संख्या आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हसबे यांची पदोन्नतीने खानापूरला बदली झाली. या दवाखान्यात अगोदरच ड्रेसर, शिपाई याच्या जागा रिक्त आहेत. 

आता येथील दवाखान्याचा कार्यभार माहुलीच्या डॉक्‍टरकडे सोपविण्यात आला आहे. दोन दिवस दवाखान्यात उपस्थित राहण्याचे वेळापत्रक आहे; पण माहुलीचे प्रभारी डॉक्‍टर अपवादानेच त्यांच्या सोयीनुसार दवाखान्यात उपस्थित राहतात. त्यामुळे दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नसल्याने सध्या सुरू असलेले लसीकरणाचे काम खासगी डॉक्‍टरवर सोपवू लागले आहेत. 

परिसरातील जनावरांसाठी शासनाने उभारलेला सुसज्ज दवाखाना कुचकामी ठरला आहे. शासकीय दवाखान्यात जनावरांना उपचार मिळत नसल्याने शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्‍टरांची मदत घ्यावी लागते. खासगी डॉक्‍टर मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करून आर्थिक लूट करीत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याची परवड अनेक वर्षांपासून अशीच सुरू असल्याने "असून अडचण, नसून खोळंबा' अशी दवाखान्याची स्थिती झाली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand animals were hanged in Vejegaon