ट्रॅक्‍टर विहिरीत कोसळल्याने तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

गोरख चव्हाण
Monday, 25 January 2021

बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथे ट्रॅक्‍टर विहिरीत कोसळल्याने तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.

कवठेमहांकाळ : बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथे ट्रॅक्‍टर विहिरीत कोसळल्याने तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना काल (ता. 23) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. तेजस श्रीरंग माळी (वय 3) असे बालकाचे नाव आहे. या वेळी ट्रॅक्‍टरवर बसलेला तेजसचा भाऊ गुरुनाथ श्रीरंग माळी (4) हा खाली पडल्याने त्याचा जीव वाचला. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली. घटनेची माहिती पोलिसपाटील जगन्नाथ बागले यांनी पोलिसांना दिली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः बनेवाडी येथील माळीवस्ती परिसरात श्रीरंग माळी यांची शेती आहे. काल शेतातील कामासाठी ट्रॅक्‍टर घेऊन गेले होते. त्यांची तेजस व गुरुनाथ ही मुले सोबत शेतात होती. दिवसभरात शेतातील कामे उरकून घरी जाण्यासाठी माळी हे ट्रॅक्‍टरमध्ये बसले. तसेच, दोन्ही मुलांनाही ट्रॅक्‍टरमध्ये बसविले.

परंतु, शेतातील कामासाठी आणलेले साहित्य विसरल्याचे लक्षात आले. ते साहित्य आणण्यासाठी गेले. नेमके याचवेळी ट्रॅक्‍टरमध्ये बसलेल्या दोन मुलांपैकी एकाचा पाय चुकून ट्रॅक्‍टरच्या क्‍लचवर पडला. यामुळे अगोदरच उतरतीला उभा असलेला ट्रॅक्‍टर वेगाने विहिरीच्या दिशेने गेला आणि विहिरीत कोसळला. 

या वेळी ट्रॅक्‍टरमध्ये बसलेल्या दोघांपैकी गुरुनाथ ट्रॅक्‍टरवरून पडला व बचावला; तर तेजस विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी तीन विद्युत मोटारींचा वापर करण्यात आला. या दरम्यान, भारनियमन असल्याने शेतातील वीज गेली होती. मात्र, "महावितरण'ने सहकार्य करीत पुन्हा वीज सुरू केली. तब्बल तीन तास मोटारींच्या सहाय्याने पाणी उपसा करीत तेजस याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. 

दरम्यान, ट्रॅक्‍टर विहिरीत पडल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे विहिरीजवळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती. काल रात्री उशिरा तेजसचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्‍टरही विहिरीतून काढण्यात आले. कवठेमहांकाळ पोलिसांत घटनेची नोंद झाली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three-year-old boy dies after falling into tractor well at banewadi- kavathe mahankal