झोपेतच सिद्धूच्या अंगावर पडले गरम पाणी अन् कुटुंबाने फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूला मृत घोषित केले.

जत (सांगली) : साळमळगेवाडी (ता. जत) येथे गरम पाणी अंगावर पडून एका तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर वडील भाजून जखमी झाले. सिद्धू (वय ३ वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून परशुराम गुराप्पा सखरे (वय ३०, रा. साळमळगेवाडी, ता. जत) असे जखमीचे नाव आहे. उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूला मृत घोषित केले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सखरे कुटुंब बिळूर व साळमळगेवाडी सीमेवर छोट्याशा पत्र्याच्या घरात राहायला आहेत. घरी परशुराम, त्यांची पत्नी, आई - वडील व तीन वर्षांचा सिद्धू, असे राहतात. द्राक्ष बागेवर कामाला गेल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. 

हेही वाचा - त्यानंतर मात्र क्रेन चालक फरार झाला

सकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी पाणी 
तापविण्यासाठी ठेवलेल्या भांड्याला धक्का लागला व गरम पाणी झोपेत असणाऱ्या सिद्धूच्या अंगावर पडले. तर त्याला वाचविण्यासाठी गेलेले वडील परशुराम हे देखील जखमी झाले. या घटनेनंतर परशुराम यांनी मुलाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, याची नोंद उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three years boy dead in sangli jat for accident of burn in water