थरारक पाठलाग... अन्‌ फिल्मी स्टाईल मारामारी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

वेळ दुपारी दोनची.. आष्टा सांगली रोडवर तीन गाड्या भरधाव वेगाने चाललेल्या.... पुढील गाडीच्या काचा फुटलेल्या, वार होण्याच्या भीतीने ती जीवाच्या आकांताने सांगलीच्या एसपी कार्यालयाकडे धावतेय... तर कारमधील युवकावर हल्ला करण्यासाठी मागील दोन गाड्या काठ्या व इतर लवाजम्यासह पाठलाग करताहेत... कृष्णानगर, तुंग दरम्यान पाठलाग संपला अन्‌ सुरू झाली हाणामारीचा थरार...

आष्टा : वेळ दुपारी दोनची.. आष्टा सांगली रोडवर तीन गाड्या भरधाव वेगाने चाललेल्या.... पुढील गाडीच्या काचा फुटलेल्या, वार होण्याच्या भीतीने ती जीवाच्या आकांताने सांगलीच्या एसपी कार्यालयाकडे धावतेय... तर कारमधील युवकावर हल्ला करण्यासाठी मागील दोन गाड्या काठ्या व इतर लवाजम्यासह पाठलाग करताहेत... कृष्णानगर, तुंग दरम्यान पाठलाग संपला अन्‌ सुरू झाली हाणामारीचा थरार...प्रवाश्‍यांच्या समोरच रस्त्यावरून धावा धाव पळापळ, काठ्याचे धबाके, दगडांचा वर्षाव अन्‌ रक्ताच्या धारा..आरडा ओरड किंचाळ्या, सगळेच भयभीत अन्‌ क्षणात पांगा पांगी.. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, वाळवा तालुक्‍यातील ते तसे नात्यातलेच, त्यांच्यात तसा जुना वाद आहे, तो न्यायालयात सुरू आहे. त्यातूनच चार दिवसांपूर्वी पुन्हा मारामारी झालेली. त्यात एक जखमी झाला. ही मारामारी आष्टा पोलिस ठाण्यात नोंद होऊ नये, की ती परस्पर मिटवावी, यासाठी बारामतीहून आलेले नातेवाईक व त्यांच्यात सकाळी दहापासून प्रयत्न सुरू होते. एकच्या दरम्यान प्रयत्न निष्फळ ठरले... अन्‌ राग भडकला.

जखमी व्यक्तीचे नातेवाईक आष्टा येथील चौकात मेडिकल समोर थांबले होते, संतापलेल्या आणि दबा धरून बसलेल्या 7 ते8 विरोधकांनी त्यांना गाठले, अन्‌ गाडीवर हल्ला केला, गाडीच्या मागील काचा फोडल्या. जोडीदाराला तिथेच टाकून गाडीतील तिघांनी सांगलीच्या दिशेने धूम ठोकली, त्याच क्षणी शिव्या देत दोन गाडीतील आठ ते दहा जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. जीवाच्या आकांताने धावणारी गाडी अन्‌ हल्ला करण्यासाठी धावणाऱ्या दोन गाड्या सांगली रस्त्यावरून अनेकांना ओव्हरटेक करीत होत्या. 

अखेर कृष्णानगर- तुंग हद्दीत पाठलाग संपला. गाड्या थांबल्या, रस्त्याचा दोन्ही दिशेने चार चार तरुण पळत होते. गाडीतील काठ्या काढीत त्यांनी पुढील गाडीतील तिघांना मारहाण सुरू केली. काठ्या, दगड, पाडापाडी, आरडाओरड पाहत काही धाडशी प्रवशांनी मध्ये पडत सोडवासोडव केली.

दोन गाड्यांत धावतच बसत, त्यांनी अष्ट्याच्या दिशेने धूम ठोकली, नागरिकांनी आष्टा पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना पोलिस गाडीत घालून रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत रस्त्यावर तुंबळ गर्दी झाली होती... अनेक वाटसरूनी ही सिनेस्टाईल मारामारी पाहिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thrilling chase ... and movie style fights