इथे माणुसकीलाच नख लागले...! स्मशानभूमी विश्‍वस्तांच्या विरोधामुळे दफन मृतदेह पुन्हा बाहेर काढण्याची कुटुंबीयांवर वेळ 

बलराज पवार
Thursday, 10 September 2020

सांगली-  महामारी फक्त माणसाचं आयुष्यच संपवते असं नाही, तर माणुसकीलाही नख लावते. याचे विदारक चित्र आज येथील लिंगायत स्मशानभूमीत दिसले. त्याला निमित्त ठरले कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास कर्मचाऱ्यांनी दिलेल्या नकाराचे. प्रसंग असा की 12 फूट खोलवर दफन केलेले आपल्याच समाजातील बांधवाचे पार्थिव काहींच्या विरोधामुळे पुन्हा बाहेर काढण्याची वेळ एका दुर्दैवी कुटुंबावर आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल तक्रार तरी कोणाकडे करायची? 

काल (मंगळवारी) मिरजेतील कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्मशानभूमीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे तेथील अनेक पार्थिवावरील अंत्यसंस्कार थांबवण्यात आले होते. आधीच जवळच्या नातलगांच्या मृत्यूने डोंगर कोसळला असताना त्यात रेंगाळलेले अंत्यसंस्कार हे आणखी एक संकट. संबंधित कुटुंबीयांच्या नातलगांनी पालिका प्रशासनाच्या परवानगीने पार्थिव घेऊन ते दफनासाठी लिंगायत स्मशानभूमीत आणले. रीतसर दक्षता घेऊन पुरेसा खड्डा खणून दफनही केले. मात्र, त्यानंतर समाजातील विश्‍वस्त आणि काही स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला. आणि पार्थिव बाहेर काढून न्यायचा आग्रह धरला.

हे कृत्य योग्य होणार नाही अशी समजूत काढण्याचा प्रयत्न नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक शिवराज बोळाज, शेखर माने यांनी केला. मात्र, त्यांचे सारे प्रयत्न अपयशी ठरले. लोकांच्या रेट्यापुढे नातलगांनी नमते घेत पुन्हा पार्थिव बाहेर काढून मिरजेला दफनासाठी नेण्यात आले. हा सारा प्रकार सुरू असताना नातलगांवर होणारे दुःखाचे आघात कोणालाही दिसले नाहीत. आपल्या रक्तामांसाच्या माणसाची मृत्यूनंतरही होणारी अशी हेळसांड पाहणे त्यांच्या नशिबी आले. इथे प्रशासनही हतबल ठरले. अशी मृतदेहाची विटंबना करू नका, अशा विनंतीने कोणाचेही हृदय द्रवले नाही. 

""महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अंत्यसंस्काराला दोन दिवस लागतील, असे सांगण्यात आल्याने आम्ही पार्थिव ताब्यात घेतले. यात आमची काय चूक? पण आमच्याच माणसांनी आम्हाला दिलेली वागणूक वेदनादायी आहे. हे दुःख आम्हाला आयुष्यभर बोचत राहील. याची तक्रार तरी कोणाकडे करायची?'' 
- राजेंद्र माळी 
(मृताचे नातलग) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time for families to retrieve buried bodies due to opposition from cemetery trustees