esakal | "रेमडेसिवीर'ची भीक मागण्याची वेळ येऊ नये; सांगलीत औषध विक्रेत्यांचा संताप 

बोलून बातमी शोधा

2remdesivir_202

विक्रेत्यांकडे (स्टॉकिस्ट) आज अवघी 199 रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा साठा आहे.

"रेमडेसिवीर'ची भीक मागण्याची वेळ येऊ नये; सांगलीत औषध विक्रेत्यांचा संताप 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला पाचशेच्या घरात गेली आहे. सध्या 578 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या काळात होलसेल औषध आज विक्रेत्यांकडे (स्टॉकिस्ट) आज अवघी 199 रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा साठा आहे. जिल्ह्यात दोन मंत्री असूनही शासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्‍शन मिळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ एक टक्का आहे. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता रुग्णांवर रेमडेसिवीरची भीक मागण्याची वेळ येऊ नये असा इशारा राज्य औषध विक्रेना परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. 

विजय पाटील म्हणाले, ""जिल्ह्यातील केवळ तीन होलसेल औषध विक्रेत्यांकडे सध्या केवळ 199 रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा साठा आहे. हा साठा किमान दोन दिवस पुरेल. आणखी दोनशे ते अडीचशे इंजेक्‍शन येणार आहेत. मात्र कोरोनाबाधित वाढले तर इंजेक्‍शनचा पुरवठा करु शकणार नाही. चार-पाच दिवसांनी रुग्णांच्या नातेवाईकांवर इंजेक्‍शनची भीक मागण्याची वेळ येईल. त्याला जबाबदार प्रशासन असेल. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन रेमडेसिवीर इंजेक्‍शन अधिकाधिक उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 
ते म्हणाले, इंजेक्‍शनच्या किंमतीही 899 ते पाच हजार रुपये अशा आहेत. ही तफावत शासन का कमी करत नाही. लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्‍शनला लावलेला 12 टक्के जीएसटी माफ का केला जात नाही? रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे आरोप चुकीचे आहेत. तसे आढळल्यास संघटनेकडून संबंधितावर कारवाई केली जाईल. विजय पाटील म्हणाले, शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार रुग्णाला रेमडेसिवीर देण्यात यावे. औषधोपचाराने बरा होणाऱ्या रुग्णाला रेमडेसिवीर देण्याचा आग्रह धरु नये.'' 

यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, सचिव अविनाश पोरे, महावीर खोत, विनायक शेटे, संदीप पाटील, संदीप मालेकर, विजयकुमार पाटील, ललीत शहा, श्रीकांत गायकवाड आदींसह अन्य केमिस्ट बांधव उपस्थित होते. 


केमिस्ट बांधवांना लस द्यावी 
केमिस्ट बांधव हे फ्रंटलाईन कर्मचारी असल्याने शासनाने त्यांना कोरोनाची लस देण्यास प्राधान्य द्यावे. अत्यावश्‍यक सेवेत असूनही केमिस्ट बांधवांना कोरोना लस देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे केमिस्ट बांधवांना लवकर कोरोना लस द्यावी अशी मागणी विजय पाटील यांनी केली.