तृप्ती देसाई म्हणतात...तर इंदोरीकर महाराजांना गावात जाऊन काळं फासणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद आला नसता तर अकोले तालुक्‍यात महाराजांच्या गावात जाऊन त्यांना काळे फासले असते, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माध्यमांना दिली. 

नगर ः निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. पुण्याहून येत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. पोलिसांनी दोन दिवसांत महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आपल्याला आश्‍वास दिले आहे. पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद आला नसता तर अकोले तालुक्‍यात महाराजांच्या गावात जाऊन त्यांना काळे फासले असते, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माध्यमांना दिली. 

माफी कसली ती तर दिलगिरीय 
इंदोरीकर महाराजांनी संततीबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितलेली नाही. त्यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे माघार घेण्याचा विषयच नाही. महिलांना लाज आणतील अशी त्यांची हजारो वक्तव्य आहेत. गोऱ्या बायका करू नका, त्या पळून जातात. त्रोटक कपडे घातलेल्या मुलींना चपलेने झोडले पाहिजे, अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील, असेही त्या म्हणाल्या.

सरकारलापण सोडणार नाही 
सरकारनेही या घटनेची दखल घेतली पाहिजे. नाही तर आठ दिवसांनी अधिवेशन आहे, तेथे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही आमच्या महिला सोडणार नाहीत. त्यांच्या दालनात आमच्या संघटनेच्या महिला स्वतःला कोंडून घेतली, असे विधानही देसाई यांनी केले. 

देसाई बंदोबस्तात नगरला 
देसाई यांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी स्मिता अष्टेकर या सुपा टोल नाक्‍यावर जाऊन बसल्या होत्या. शिवसेनास्टाईल देसाईंना जाब विचारायचा असा त्यांचा बेत होता. देसाई यांनीही अष्टेकर यांचे आव्हान स्वीकारले होते. मात्र, पोलिसांनी त्या दोघींमध्ये फाईट होऊ दिली नाही.

स्मिता अष्टेकर व त्यांच्या सहकारी महिलांना ताब्यात घेतले. देसाई या पोलीस बंदोबस्तातच नगरला आल्या. पोलिसांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. देसाई यांनाही पोलिसांनी बंदोबस्तात आणले आणि हद्दीबाहेर बंदोबस्तातच सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tirupati Desai complains to police in Ahmednagar