खेकड्याची चर्चा धरण फुटल्याची अन्‌ खवय्यांची...

खेकड्याची चर्चा धरण फुटल्याची अन्‌ खवय्यांची...

कोल्हापूर - चिपळूणजवळ तिवरे धरण फुटले. सुन्न करणारी घटना घडली; पण घटना राहिली बाजूला. खेकड्याभोवतीच सारी चर्चा फिरू लागली. एक प्रलयकारी घटनेला खेकड्याचा संदर्भ देत विनोदाची किनार जोडली गेली. आणि बिळात राहणाऱ्या खेकड्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. लहानपणापासून ओळख असलेल्या खेकड्याची नव्याने ओळख समोर येऊ लागली...! 

पावसाळ्यात सर्दी, खोकला, कणकण जाणू लागली की, त्यावर उपाय म्हणून ‘हाण की खेकड्याचा रस्सा’ हा एकच सल्ला कोल्हापुरात हमखास मिळतो. आणि मांसाहार करणाऱ्यांच्या ताटात खेकड्याचे स्थान किती महत्त्वाचे असते हे अधोरेखित करतो. आज चिपळूणमधील तिवरे धरण खेकड्यांनी पोखरले आणि ते वाहून गेले अशी तिखटमीठ लावून सुरू असलेली चर्चा आहे. त्यामुळे खेकडा जरुर चर्चेत आहे; पण पावसाळा आला की, खेकड्याचा रस्सा हा घराघरांत परंपरागत आहार ठरलेला आहे. आणि काही हॉटेलातील डिश तर केवळ खेकड्यामुळे सजू लागल्या आहेत. 

कोल्हापुरातील ग्रामीण भाग व नदी नाल्याचा काठ हे खेकड्याचे आगर आहे. पाणथळ किंवा दलदलीच्या जागी हातभर भोकात खेकड्याचे वसतीस्थान ठरलेले आहे. खेकड्याचे बिळ हिच याच्या अस्तित्वाची ओळख आहे. आणि या बिळात विळा घालून किंवा या बिळाच्या तोंडाला चिवकाठ्याचे टोपले लावून खेकडे पकड्याची परंपरागत पद्धत आहे. 

कोल्हापुरात गोसावी समाजाचा खेकडे पकडणे हा परंपरागत व्यवसाय आहे. लहानपणापासून खेकड्याचा भाग काढण्यात पटाईत असलेली ही मंडळी केवळ नजरेने आणि विशिष्ठ आकारावरून खेकड्याचे बिळ शोधतात व खेकडे पकडतात. विशेषत: रात्री खेकडा त्याच्या बिळातून बाहेर पडतो, या अंदाजाने बिळात एक लोखंडी विळा घालतात व त्या विळ्याच्या साह्याने खेकडा बाहेर काढून सोबतच्या टोपल्यात भरतात. पूर्वी सायकलची जुनी टायर पेटवून त्या प्रकाशात ही मोहीम राबवली जात असे. आता खेकड्याची बिळे ज्या परिसरात आहेत. तेथे बारीक तोंड असलेली टोपली ठेवली जातात. त्यात खेकडा गेली की, टोपल्यात अडकतो. पहाटे ही टोपली काढली जातात व खेकडी बाजारात विक्रीस आणली जातात. 

काळ्या पाठीच्या आणि पांढऱ्या पाठीचा अशी खेकड्यांची ओळख आहे. कळे, साळवण गगनबावडा परिसरात लाल पाठ असलेले खेकडे मिळतात. खेकडा हा उष्ण असतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा आहारात वापर कमी होतो. पावसाळा व हिवाळ्यात मात्र खेकड्याचा हमखास आहारात वापर होता. आणि पटणार नाही एक खेकडा पन्नास ते साठ रुपयाला या दराने विकला जातो. 
खेकड्याच्या दबदबीत आणि चरचरीत रस्सा ही वेगळी पाककृती आहे. कोल्हापुरात ही पाककृती घराघरांत माहिती आहे.

खेकड्याचे कवच बाजूला काढून त्यातील नेमका मांसल भाग खाणे हा सरावाचा भाग आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी, केर्ली, केर्ले, आंबेवाडी रेडे डोह, शिये पूल, उचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगा पूल येथे खेकड्याचा बाजार फुलला आहे. गोसावी समाजातील तरुण मंडळी रात्री खेकडे पकडण्यासाठी नदी, नाले, दलदलीच्या काठी व सकाळी खेकड्याच्या विक्रीत गुंतली आहेत. सहा खेकड्याची एक थाळी ३०० रुपयाला म्हणजे गोसावी लोकांच्या दृष्टीने ‘सिझन’चाच काळ आहे. 

...तर सगळी धरणे फुटली असती
 या चर्चेची जोड यावेळी खेकडा विक्रीच्या ठिकाणी जरुर आहे. उत्तम गोसावी, प्रताप गोसावी, तानाजी, अरुण व दीपक यांनी तर पंचगंगा नदीजवळ नव्या पुलावर पोती भरून खेकडे आणली आहेत. खेकड्यामुळे धरण फुटले का?, असे उत्तमला विचारले असता त्याने ‘साहेब असे असते तर सगळी धरणे फुटली असती’ एवढे एकच वाक्‍यात उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘खेकडा कोरडी जमीन पोखरत नाही. तो दलदलच पोखरतो व साधारण दोन हात खोलीच्या बिळात राहतो.

स्वतंत्रपणे फिरू शकत नाही
एकमेकाचे पाय ओढणारी जात म्हणजे खेकडा असे म्हटले जाते. ती वस्तुस्थिती आहे. कारण एखाद्या बुट्टीत खेकडे ठेवले व त्यातला एखादा खेकडा बाहेर पडू लागला तर त्याच्या पाठोपाठ दुसरा खेकडा येतो व त्याच्या पायात आपले पाय घालतो. तिसरा खेकडा तसेच करतो. त्यामुळे कोणीच स्वतंत्रपणे फिरू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com