
सांगली : निसर्गातील जैवविविधता जिथे पाहायला मिळते त्या दंडोबा डोंगरावर लॉकडाउनच्या काळातही मोठी गर्दी होत आहे. प्रामुख्याने तरुण-तरुणींचा यात जास्त भरणा आहे. धांगडधिंगा, नशापान, गुंडागर्दी, आक्षेपार्ह वर्तनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे.
लॉकडाउन असताना पर्यटनासह मौजमजेसाठी जिल्हाभरातील अनेकांचा येथे वावर असतो. छेडछाड, लुटीच्या घटनांमुळे गैरप्रकाराला उत आला आहे. मध्यंतरी काही दिवस तैनात असणारा पोलिस बंदोबस्त आता नसल्याने गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर असणारा हा डोंगर प्राचीन आहे. विपुल निसर्गसंपदा, पशू, पक्षी, प्राण्यांचा अधिवास, तसेच निसर्गरम्य वातावरणामुळे दूरदूरचे पर्यटक येथे भेटी देत असतात. येथे दंडनाथाचे गुहेतील स्वयंभू मंदिर, मंदिराभोवतीचे भुयार, डोंगरावरचा उंच मनोरा, केदारलिंग, गुप्तलिंग देवालय यांसह राम टाके, खोल दऱ्या, डोंगर प्रसिद्ध आहेत.
या देवस्थानाचा क वर्ग पर्यटन स्थळामध्ये समावेश झाला आहे. डोंगरावर अनेक चांगली विकासकामे झाली आहेत. साहजिकच येथे पर्यटनासाठी गर्दी वाढत आहे.
कवठेमहांकाळसह मिरज, सांगली परिसरांतील तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे सुटीच्या दिवशी डोंगरावर गर्दी करत असल्याचे दिसते. दर सोमवारी तसेच अमावस्येला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रशासनाने मंदिर अद्यापही बंद ठेवले आहे;
मात्र पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. प्रामुख्याने तरुण-तरुणींचे घोळके मोठ्या प्रमाणात येत असल्याने किरकोळ कारणावरून वादावादीचे प्रसंग वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात मुलीकडे बघण्याच्या कारणावरून मंदिरानजीकच दोन गटांत जोरदार राडा झाला. स्थानिकांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना तेथून पिटाळले; मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
----
तळीरामांना आवरण्याची गरज
पावसाळा सुरू झाल्याने डोंगरावर हिरवाई बहरत आहे. त्यातच तळीराम मद्यपानाचा आसुरी आनंद घेतात. उंच मनोऱ्यावरही अनेकजण धोकादायक अवस्थेत सेल्फी टिपण्याचा प्रयत्न करतात. पावसामुळे निसरड्या रस्त्यावरही तरुणांची बाईकवरून स्टंटबाजी धोकादायकरित्या सुरू असते. सेल्फी काढण्याच्या नादात जीवावर उदार झाल्यासारखे वर्तन मद्यपींचे सुरू असल्याचे दिसते. डोंगरावर नशाबाजांकडून धुमाकूळ घालण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्याचा विनाकारण त्रास भक्त, पर्यटकांना होत असल्याच्या तक्रारी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.