आता गावे होणार टकाटक ; आजपासून "स्वच्छता ही सेवा' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

यामध्ये प्राधान्याने प्लॅस्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

सातारा : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या अनुषंगाने देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्याने प्लॅस्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत उद्या (ता. दोन) जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येणार असल्याने गावे टकाटक होणार आहेत. 
प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जमीन, पाणी, पर्यावरण, हवा यांचे प्रदूषण होत आहे. यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. यासाठी गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, भजनी मंडळे, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्रे, राष्ट्रीय छात्र सेना, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील शासनाचा सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत महाश्रमदान केले जाईल. सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकत्रित प्रयत्नातून प्लॅस्टिक संकलन उपक्रम राबविला जाणार आहे. 

जिल्हा परिषदेमार्फत प्लॅस्टिक संकलन उपक्रमाची जनजागृतीही केली जात आहे. या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेच्या jalshaktisatara@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना श्री. भागवत यांनी दिले आहेत. यामध्ये उपक्रमांचे ठिकाण, उपस्थित लोक, किती नागरिकांचा सहभाग, किती किलो प्लॅस्टिक जमा झाले व किती तास श्रमदान झाले व उपक्रमांची छायाचित्रे पाठवावी लागणार आहेत. त्यामुळे जिल्हाभरात किती टन प्लॅस्टिक संकलित झाले, याची माहितीही उपलब्ध होणार आहे. 
 

प्लॅस्टिकचा पुनर्वापर 

गावातील संपूर्ण प्लॅस्टिक कचरा संकलित करेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्लॅस्टिक संकलनानंतर एकत्रित झालेला प्लॅस्टिक कचरा पुनर्चक्रणाकरिता प्लॅस्टिक पुनर्चक्रण करणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणार आहे. गावात पूर्ण स्वच्छता होईपर्यंत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From today the cleaning service activities in the villages