कॉंग्रेस उमेदवारांची घोषणा उद्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींसाठी कॉंग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे आज सादर करण्यात आली. शनिवारी (ता. 4) ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही गट व गणात एक, तर काही ठिकाणी दोन-तीन उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात आली आहेत. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींसाठी कॉंग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे आज सादर करण्यात आली. शनिवारी (ता. 4) ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही गट व गणात एक, तर काही ठिकाणी दोन-तीन उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात आली आहेत. 
दरम्यान, शनिवारी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचदिवशी उमेदवारांना पक्षाचे ए, बी फॉर्म देण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतच हे फॉर्म स्वीकारले जाणार असल्याने पक्षाने ही व्यवस्था केली आहे. सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, रविवारी सुटीदिवशीही अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 

या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडे गट व गणातून मिळून 532 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. कागल, पन्हाळा, आजरा व गडहिंग्लज वगळता इतर तालुक्‍यांतून कॉंग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची भाऊगर्दी आहे. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती दहा दिवसांपूर्वी झाल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील या याद्यांसह मुंबईला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. 

प्रदेशाध्यक्षांशी काल याबाबत चर्चा होणार होती; पण ती झाली नाही. आज मुंबईतील कॉंग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयात श्री. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रत्येक गट व गणातील पहिल्या दोन प्रबळ उमेदवारांचा समावेश असलेली यादी सादर करण्यात आली. काही ठिकाणी एकाच उमेदवाराने मागणी केली आहे, तर काही गट व गणात एकच उमेदवार प्रबळ आहे, अशी स्वतंत्र यादीही सादर करण्यात आली. यावर उद्या (ता. 3) अंतिम निर्णय होणार असून, रात्रीच यादी जाहीर करण्यात येईल. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारांची घोषणा शनिवारी ए, बी फॉर्मसह करण्यात येणार आहे. 

आज पहिली यादी शक्‍य 
ज्या गट व गणात एकाच इच्छुकाने उमेदवारी मागितली आहे, त्या गट व गणातील उमेदवारांची पहिली यादी उद्याच (ता. 3) जाहीर करण्यात येणार आहे. किमान 20 ते 22 ठिकाणी एकाच उमेदवाराने मागणी केली आहे. अशा ठिकाणचे उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Tomorrow Congress announced candidates list