विषय संपला... इंदोरीकरांचा तो व्हिडिअोच डिलीट, कारवाईबाबत पीसीपीएनडीटी काय म्हणते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

इंदोरीकरांचा खुलासा समितीने मान्य केला होता. महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. इंदोरीकरांच्या यू ट्यूबवरील कीर्तनाचा पुरावा म्हणून वापर केला जात होता

नगर ः इंदोरीकरांच्या कीर्तनावरून उठलेले वादळ शांत व्हायला तयार नाही. रोज एक नवा एक नवा खुलासा होत आहे. इंदोरीकरांनी मी तसे कीर्तनच केलेेले नाही, असा खुलासा पीसीपीएनडीटीकडे केला होता. त्यानंतर ही समिती काय कारवाई करते याकडे लक्ष लागले होते.

इंदोरीकर महाराजांनी सम-विषम तिथीच्या समागमाविषयी वक्तव्य केल्याच्या आरोपातून हा वाद उफाळला होता. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले होते.

इंदोरीकरांचा खुलासा समितीने मान्य केला होता. महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. इंदोरीकरांच्या यू ट्यूबवरील कीर्तनाचा पुरावा म्हणून वापर केला जात होता. 

तो व्हिडिअोच डिलीट

पोलीस यंत्रणेनेही पुराव्यांची सत्यता केल्यानंतरच इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु ज्या व्हिडिअोवरून हे वादळ उठले होते. तो व्हिडिअोच यू ट्यूब चॅनलवरून डिलिट करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनाही पुढील कारवाई करता येत नाही. नगरची सायबर गुन्हे अन्वेषण शाखेनेही सर्च मोहीम सुरू केली आहे. परंतु त्यांना तो व्हिडिअो सापडत नसल्याचे समजते.

दुसरी नोटीस देता येणार नाही

जिल्हा शल्य चिकित्सक पीसीपीएनडीटी समितीत आहेत. त्यांच्याकडेच महाराजांनी वकिलांमार्फत लेखी खुलासा केला होता. नगर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात माझे असे कोणतेच कीर्तन झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. आता पीसीपीएनडी समितीलाही तो व्हिडिअो सापडत नाही. त्यामुळे दुसरी नोटीस पाठविता येणार नसल्याचे या समितीकडून स्पष्ट करण्यात आले.

देसाई यांच्या भूमिकेकडे लक्ष

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अकोल्यात बंद पाळून मोर्चा काढण्यात आला होता. सोशल मीडियातही महाराजांच्या बाजूने लोकभावना आहे. तृप्ती देसाई यांनी दोन दिवसांत महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांच्या गावात जाऊन काळे फासण्याचा इशारा दिला होता. आता त्या नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अकोल्यातील महिलांनीही देसाई यांचा समाचार घेण्याची भाषा केली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The topic is over delete that video of Indorekar