चांदोली धरण परिसरात मुसळधार; आजअखेर 1049 मिलीमीटर पाऊस

विष्णू मोहिते 
Wednesday, 5 August 2020

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदोली धरण परिसरात आज अतिवृष्टी झाली.
 

सांगली : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदोली धरण परिसरात आज अतिवृष्टी झाली. 71 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. चांदोलीत गेल्या पंधरा दिवसापासून पावसाचा खंड पडला होता. इस्लामपूर, वाळवा, पलूस, भिलवडी, आष्टा परिसरात दमदार पाऊस झाला. मध्य भागातील तासगाव, मिरज तालुक्‍यातही चांगला पाऊस झाला. पूर्व भागात हलका पाऊस सुरु आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी पाऊस उपयुक्त आहे. 

वारणावती ः शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाबरोबरच सोसायट्याचा वारा, परिसरात गारठा निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासात चांदोली धरण परीसरात 71 मिलीमीटर इतक्‍या अतिवृष्टीच्या पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या चांदोली धरणात 23.92 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी 69.54 टक्के इतकी आहे. धरणक्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 71 मिलीमीटर इतक्‍या अतिवृष्टीसह आजअखेर धरणक्षेत्रात एकूण 1049 मिलीमीटर पाऊस झाला. 

शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील मणदुर, सोनवडे, आरळा, करुंगली, मराठेवाडी, काळुंद्रे, पणुंब्रे वारुणसह येथील वाड्यावस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परीसरातील ओढे, नाले तुडुंब भरुन वहात आहेत. मुसळधार पावसामुळे वारणानदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. 

पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासुन पावसाने दडी मारली होती. सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे धरणातील पाणीपातळीत ही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीपातळी 615.10 मीटर तर धरणात 677.424 द.ल.घ.मी म्हणजेच सध्या धरणात 23.92 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. धरण 69.54 टक्के भरले आहे. भात शेतीमध्ये पाणी साचले आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.29 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 49.7 मिलिमिटर पाऊस पडला. पाऊस व कंसात 1 जूनपासून आजअखेर पडलेला पाऊस ( मिलिमिटरमध्ये) असा- मिरज 6.2 (242.4), तासगाव 9.9 (250.9), कवठेमहांकाळ 4.9 (323.8), वाळवा-इस्लामपूर 16.5 (266.6), शिराळा 49.7 (556.2), कडेगाव 5.8 (240.4), पलूस 16.8 (205.8), खानापूर-विटा 6.2 (370.2), आटपाडी 0.00 (245.9), जत 0.5 (196). 

धरण व पाणीसाठा ( टीएमसी) असा 
वारणा- 23.92 
कोयना- 54.20 
धोम- 6.75 
कन्हेर- 7.94 
अलमट्टी- 91.13 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torrential rains in Chandoli dam area; 1049 mm of rain till today